दारूविरोधात महिलांचा दुर्गावतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:09 AM2017-09-23T00:09:09+5:302017-09-23T00:09:52+5:30
सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली. दुकान स्थानांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा महिलांनी रेटून धरली. रणरागिणींनी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या देशी दारूच्या बाटल्यांची फेकफाक केली आणि या दुकानाला महिलांनीच कुलूपही ठोकले.
जुन्या वस्तीतील उपरोेक्त मद्यविक्रीचे दुकान हे शाळा, मंदिर, व रहिवासी वस्तीच्या अगदी मध्यभागी आहे. त्यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते, असा महिलांचा मुद्दा आहे. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोठ्या संख्येने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी शासनाच्या मध्यस्थीने बरीच दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. भगतसिंग चौकातील हे देशीदारू विक्रीचे दुकान देखील बंद होते. पूर्वीपासून या दुकानाला परिसरातील नागरिकांचा विशेषत: महिलांचा व सामाजिक संघटनांचा विरोध आहे. अनेकदा प्रशासनाकडे दुकानाच्या स्थानांतरणाची मागणी करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर, शुक्रवार रोजी हे दुकान सकाळी ११ वाजता सुरू झाले. दुकानात दारूचे बॉक्स आणण्यात आले. मात्र, लगोलग परिसरातील तब्बल ५०० च्या जवळपास महिलां व पुरूषांनी दुकानावर धडक दिली. बाटल्या, दारूचे बॉक्स फेकून व नारेबाजी करीत निषेध नोंदविला. पंधरवड्यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. दुकानाच्या स्थानांतरणाचीी मागणी तक्रारकर्त्यांनी केली होती. दुकानाच्या स्थानांतरणासाठी मतदान घेण्याची तयारी देखिल महिलांनी दर्शविली होती. नगरसेविका गंगा आंभोरे, छाया अंबाडकर, अलका अंबाडकर, सिंधू मतलाने, सुशीला गव्हाळे, लीला चिरडे, शोभा आजनकर, सविता ईखार, शालिनी टारपे, प्रीया भगत, सीमा हिवराळे, सुमन सुने, सुभद्रा मोडक, दुर्गा भैसने, नीता बांडाबुचे, सुनंदा दारोकार आदी महीला व पुरूष उपस्थित होते. बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.