मोहफुले वेचताना झाले बाळंतपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:39 AM2019-04-29T01:39:31+5:302019-04-29T01:40:07+5:30
मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे.
श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटात अशिक्षितपणामुळे अनिष्ट रूढी कायम आहेत. त्यामुळेच आधुनिक सुधारणा स्वीकारण्याकडे त्यांचा कल नसतो. अशावेळी उभ्या ठाकलेल्या संकटातून निभावल्यास कौतुक होते. असेच कौतुक चाकर्दा येथील महिलेच्या वाट्याला आले आहे. मोहफुले वेचताना बाळंत झालेल्या या महिलेने दगडाने ठेचून नाळ तोडली आणि तेथून दीड किमी चालत गावी आली. सर्व लसीकरणाला नकार देऊनही तिने सुदृढ बाळाला जन्म दिला, हे विशेष.
धारणीपासून १४ किलोमीटर अंतरावरील चाकर्दा या गावातील दहा-बारा दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना (बदललेले नाव) ही दोन वर्षांपासून पतीसोबत रोजगारानिमित्त आपल्या आई-वडिलांकडे माहेरी राहत होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती चाकर्दा गावात परतली. तिचे हे पाचवे बाळंतपण होते आणि दिवस पूर्ण झाले असल्यामुळे तिने घरी राहावे, असा सल्ला उपसरपंच व आशा वर्कर यांनी दिले होता. तत्पूर्वी, १० एप्रिल रोजी गावातील लसीकरण शिबिरकरिता तिला बोलावण्यात आले. परंतु, ती लसीकरणासाठी आली नाही. गावापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरील गावतलावालगत असलेल्या शेतात ती मोहाफुले वेचण्यासाठी पतीसोबत गेली होती. मोहाफुले वेचत असताना तिला प्रसूतिकळा सुरू झाल्या आणि तिने जंगलातच एका गोंडस बालिकेला जन्म दिला. या माउलीने दगडावर ठेचून नाळ कापली आणि त्याच अवस्थेत नवजाताला घेऊन ती दीड किलोमीटर पायी चालत गावात आली. तिने हा घटनाक्रम ग्रामस्थांना कथन केला.
दुसरीकडे या माउलीच्या धैर्याचे कौतुकसुद्धा होऊ लागले आहे. प्रसूतीची माहिती मिळताच गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी तिच्या घरी पोहोचले. तिच्यावर आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
कल्पनाची प्रसूती झाल्याचे कळताच गावातील आशा वर्करसोबत जाऊन वैद्यकीय सेवा पुरविली. नवजात व प्रसूता दोन्ही तंदुरुस्त आहे.
- प्रवीणा मोहोड,
अंगणवाडी सेविका, चाकर्दा