पाठलागावेळी ‘महसूल’च्या वाहनावर ‘कार’ घातली, वाळूचा ट्रक निसटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:03 PM2024-02-07T23:03:39+5:302024-02-07T23:03:59+5:30
संघटित वाळू तस्करी : ट्रक पळविला, ११२ वर मिळाली नाही मदत
- मनीष तसरे
अमरावती : अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाईचा फास आवळण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयाने तीन गस्ती पथके निर्माण केली आहेत. मंगळवारी रात्री मोर्शी मार्गावर एका गस्ती पथकाने डवरगाव नजीक उभ्या असलेल्या ट्रकचालकाची चौकशी केली असता, त्याने ट्रक पळवून नेला. पाठलागादरम्यान एक कार थेट गस्ती पथकाच्या वाहनावर नेण्यात आली. यू-टर्न घेत ट्रकसारखेच कारचालकानेही घटनास्थळाहून पलायन करण्यात यश मिळविले.
बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळू, मुरूम, गिट्टी यांचे अवैध उत्खनन, वाहतूक रोखण्यासाठी, अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयामार्फत पथके तयार करण्यात आहेत. त्यानुसार मंगळवारी रात्री मोर्शी मार्गावर माहुलीनजीक पथक गस्तीवर होते. वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती अमरावती तहसील कार्यालयाला मिळतातच जिल्हाधिकारी व विभागीय कार्यालयाच्या आदेशाने तहसील कार्यालयाने गस्त पथकाला रवाना केले होते.
पाठलागावर असलेल्या गस्ती पथकाच्या वाहनावर काही अंतरावर अचानक एक चारचाकी कार विरुद्ध दिशेने तीव्र वेगाने आली. त्यामुळे चालकाने वेग कमी केला. त्यामुळे ट्रक बराच पुढे निघून गेला. त्यापाठोपाठ क्षणाचीही उसंत न घेता कारनेही यू-टर्न घेत ट्रकच्या दिशेने वेगाने पलायन केले. या घटनाक्रमाने गोंधळलेल्या महसूल पथकाने डायल ११२ कडून मदत मागितली. तथापि, ती मिळू शकली नाही. तथापि,याप्रकरणी माहुली जहागीर पोलीस ठाण्यात नायब तसीलदार टीना चव्हाण तक्रार दाखल केली.
महसूल पथकात संताेष चव्हाण, अजय पाटेकर, हेमंत गावंडे, केदारनाथ जोशी, वाय.एम. चतुर, पवन राठोड, मनोज धर्माळे, विजय वाघमारे, अभिजित देशमुख सहभागी होते.