ग्रामीण भागातील 'त्या' संगणकांवर धुळीचे थर
By admin | Published: February 16, 2016 12:21 AM2016-02-16T00:21:48+5:302016-02-16T00:21:48+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ...
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : भारनियमन, पुरेशा जागेचा अभाव
अमरावती : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान १० ते १४ या वयोगटात प्राप्त व्हावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद शाळा व खासगी शाळांना संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र विद्युत भारनियमन, संगणक परिचालक पुरेशा जागेचा अभाव यामुळे तर काही ठिकाणी विद्युत देयके, संगणक दुरुस्तीसाठी वेगळा निधी मिळत नसल्यामुळे बऱ्याच शाळांमधील संगणक धूळ खात आहेत.
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित आहेत. शासनाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये २००६ - २००७ पासून संगणक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या नियमसंगत असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत दहा संगणक संच मिळाले आहेत. फक्त सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळाले. त्यानंतर संगणकात झालेला बिघाड व दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाकडे नसलेल्या निधीची तरतूद, विद्युत देयके भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसल्याने अनेक शाळांमधील संगणक सध्या धूळ खात पडले आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाच्या या योजनेलाही फटका बसत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे संबंधितांनी आवर्जून लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनामार्फत संगणकावर लाखो रुपये खर्च करण्यात येते. परंतु ग्रामीण भागामधील शाळांमधून संगणकाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)