तक्रारींचे निराकरण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:43 AM2019-06-13T01:43:49+5:302019-06-13T01:44:39+5:30
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, त्यांना समस्यांतून मुक्त करणे, तक्रारींच्या अनुषंगाने त्यांचे समाधान करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेला सूचना देऊ. अशा पद्धतीने पोलिसांनी कामे केल्यास नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रोष राहणार नाही. पोलिसांची प्रतिमा मलीन होणार नाही, असे मत नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
आयजी मकरंद रानडे यांनी एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील आंध्रा बँकेत कर्तव्य बजावले. पिंपरी चिचवड येथे दहा महिने अपर पोलीस आयुक्तपद भूषविले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील १० प्रमुख युनिटची धुरा सांभाळली होती. नाशिक, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नागपूरनंतर पुणे व पिंपरी चिचवड येथील पोलीस विभागात कर्तव्य बजावले.
मकरंद रानडे हे १९८८ मध्ये डीवायएसपी पदावर रुजू झाले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना २००२ मध्ये आयपीएसचा दर्जा प्राप्त झाला. नाशिक येथील कुंभमेळ्यातील सुरक्षेची जबाबदारी रानडे यांनी पार पाडली. तेथील सुरक्षेविषयी रानडे यांना दोन वेळा बोलाविण्यात आले होते. २००४ मध्ये रानडे यांना राष्ट्रपती पदकाने भूषविण्यात आले. त्यांना पोलीस महासंचालक आणि भारत सरकारचे बोधचिन्ह मिळाले. पुणे येथील पिंपरी चिंचवड येथून पदोन्नत बदली होऊन मकरंद वानखडे यांनी नुकताच अमरावती परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक पदभार स्वीकारला.
अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन, विविध पोलीस ठाण्यांना व अधिकाऱ्यांना भेटी देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न मकरंद रानडे हे करणार आहेत. प्रलंबित प्रकरणांकडे विशेष लक्ष देऊन, ती निकाली काढण्यास प्राधान्य राहणार आहे.
नागरिक न्यायाच्या अपेक्षेने पोलिसांकडे येतात. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक देणे, त्यांची समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे, याबाबत दखल घेऊ. नागरिकांचे समाधान करण्याकडे लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय दिल्यास ते समाधानी होतात. त्यावेळी पोलिसांची प्रतिमा उंचावते, असे मत स्पेशल आयजी मकरंद रानडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन संवेदनशील परिसराकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले.