शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 10, 2023 12:38 PM2023-04-10T12:38:22+5:302023-04-10T12:40:22+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत, तसेच आकस्मिक अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन
अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथील पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत, तसेच आकस्मिक अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यांनी रुग्णालयातील विविध सुविधांची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दीपस्तंभासारखे काम केले. ते दूरदर्शी व द्रष्टे होते. समाजाला त्यांनी शिक्षणाची दिशा दिली. भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे.
१२५ वे जयंती वर्ष शासनाचे वतीने साजरे करणार
यंदा डॉ. पंजाबरावं देशमुख यांचे १२५ वे वर्ष जयंती वर्ष आहे. हे वर्ष शासनाच्या वतीने साजरे करण्यात येईल. पापळ येथे याच वर्षात कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल. स्मारकासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल. संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री म्हणाले.