तपोवन वर्कशॉपमध्ये होणार ई-बस चार्जिंग; बडनेरासह ७ आगारात प्रस्ताव, चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन
By जितेंद्र दखने | Published: November 30, 2023 07:24 PM2023-11-30T19:24:56+5:302023-11-30T19:25:44+5:30
अमरावती मध्यवर्ती बसस्टँड व डेपोमध्ये जागा नसल्याने तपोवन येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
अमरावती: अमरावती मध्यवर्ती बसस्टँड व डेपोमध्ये जागा नसल्याने तपोवन येथील वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आधी बडनेरा स्थानकावर जागा नसल्याने राजापेठ येथे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ठरले होते. परंतु, आता बडनेरा स्थानकाजवळ जागा मिळाल्यामुळे तेथेच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यासह अचलपूर, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, दयार्पूर या ठिकाणीही चार्जिंग स्टेशन उभारण्यास एसटी महामंडळाने अनुमती दिली आहे. याशिवाय चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे स्थानिक विभागीय नियंत्रक कार्यालयाने सादर केला आहे.
अमरावती विभागासाठी एसटी महामंडळाकडे १७३ इलेक्ट्रिक बसची मागणी केली आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी, चार्जिंग स्टेशन उभारावे लागतील. याकरिता विभाग नियंत्रक कार्यालयाने ७ ठिकाणी इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हाभरात एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनसाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तसेच महावितरणकडून परवानगी व उच्च दाबाची विद्युत वाहिनी घ्यावी लागणार आहे. ज्या डिझेल एसटी बसची मुदत संपली त्यांच्या जागी इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससह डिझेल बसही विभागात धावतील. अमरावती विभागात आधीपासूनच तंत्रज्ञ आहेत. ते इलेक्ट्रिक बसचा रखरखाव तसेच दुरुस्तीसाठी कामी येतील. कारण बसची यंत्रे ही सारखीच असून, केवळ या बस विजेवर धावतील. त्यामुळे आधीचेच तंत्रज्ञ या कामी वापरता येतील, अशी माहिती अमरावती विभागीय नियंत्रकांनी दिली.
निविदा प्रक्रियेला गती
अमरावती एसटी विभागातील आठपैकी सात डेपोमध्ये इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चांदूर बाजार येथे सीएनजी स्टेशन प्रस्तावित आहे. -नीलेश बेलसरे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ अमरावती