ई-वन वाघिणीची दहशत; म्हैस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:27 AM2019-07-08T01:27:41+5:302019-07-08T01:28:02+5:30
वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी एक वाजता व्याघ्र प्रकल्पाच्या अरण्यात कवडा झिरीनजीकच्या जामोद येथील हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा ठरला.
ब्रह्मपुरीहून येथील जंगलात सोडलेल्या ई-वन वाघिणीची दहशत आणि सतत होत असलेले हल्ले पाहता आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातून संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून दोन वर्षीय ई-वन वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत डोलार जंगलात १५ दिवसांपूर्वी सोडण्यात आले. त्या वाघिणीने व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने सोडण्यात आलेल्या गोºह्याची शिकार केली. आठवड्यात तिने येथील एका आठ वर्षांच्या बालिकेवर हल्ला केला. तिच्या वडिलांसह गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. त्याच जंगलात तिने रानडुकराची शिकार केली. त्यानंतर परिसरात पोलिसांसह व्याघ्र प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून १२ घरांना तार कुंपन लावण्याचे आदेश देत व्याघ्र कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.
संघर्ष होण्याची शक्यता
डोलार येथील जंगलात ई-वन वाघिणीला सोडल्यानंतर परिसरातील सर्व गावे दहशतीत आली आहे. शनिवारी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, बाबूलाल मावस्कर, कालू मालवीय, उपसरपंच आदींची कावळाझिरी येथे बैठक झाली. व्याघ्र प्रकल्पाला विनंती करून सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे ठरविण्यात आले. तसे पत्रसुद्धा पूर्वीच दिले आहे. यात व्याघ्र प्रकल्पाने योग्य निर्णय न घेतल्यास आदिवासी व्याघ्रप्रकल्प, असा संघर्ष उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बछड्यासह मालकाला जीवदान
गणपत उदय काळे (३५, रा. कवडाझिरी) यांचा पशुपालनासह दुधाचा व्यवसाय असल्याने नेहमीप्रमाणे ते नजीकच्या जामूनझिरा येथे गुरांना चराईसाठी घेऊन गेले. शनिवारी दुपारी अचानक ई-वन वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी आपल्या म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. दुसरीकडे आपल्या मालकावर हल्ला होत असल्याचे पाहून सर्व म्हशींनी एकत्र येऊन वाघाला पिटाळून लावले. मात्र, काही वेळात परत म्हशीच्या बछड्यावर त्या वाघाने झडप घेतल्याने म्हशीने वाघावर प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली.