मेळघाटातील नरभक्षक ई-वन वाघिण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 07:45 AM2019-09-02T07:45:25+5:302019-09-02T07:48:38+5:30

मेळघाटात सोडण्यात आलेल्या ई-वन वाघिणीला व्याघ्रप्रकल्पाच्या रेस्क्यू टीमने धारणी तालुक्यातील गोलाईनजीकच्या जंगलात पकडले आहे.

E one tigress in Melghat Tiger Reserve Forest | मेळघाटातील नरभक्षक ई-वन वाघिण जेरबंद

मेळघाटातील नरभक्षक ई-वन वाघिण जेरबंद

Next
ठळक मुद्दे मेळघाटात सोडण्यात आलेल्या ई-वन वाघिणीला व्याघ्रप्रकल्पाच्या रेस्क्यू टीमने धारणी तालुक्यातील गोलाईनजीकच्या जंगलात पकडले आहे. दोन महिन्यापासून या वाघिणीची दहशत मेळघाटातील चाळीसगावात होती. वाघिनीने दीड महिन्याच्या कालावधीत शेळ्या, गायी, बैल फस्त केले.

चिखलदरा (अमरावती) - मेळघाटात सोडण्यात आलेल्या ई-वन वाघिणीला व्याघ्रप्रकल्पाच्या रेस्क्यू टीमने धारणी तालुक्यातील गोलाईनजीकच्या जंगलात पकडले आहे. मागील दोन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सोडण्यात आलेल्या ई-वन वाघिणीला रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या दरम्यान धारणी तालुक्यातील गोलाई नजीकच्या जंगलात पकडण्यात व्याघ्रप्रकल्पाच्या रेस्क्यू टीमला यश आले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी एका शेतात आदिवासी शोभाराम चव्हाण या शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते, तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले होते. सतत दोन महिन्यापासून या वाघिणीची दहशत मेळघाटातील चाळीसगावात होती. मेळघाटातील धारणी तालुक्यात वाघिणीची दहशत  होती. या वाघिनीने दीड महिन्याच्या कालावधीत शेळ्या, गायी, बैल फस्त केले. तसेच महिला व मुलींवर देखील हल्ला चढविला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी जंगलातून ही नरभक्ष वाघिण तालुक्यातील डोलार जंगलात सोडण्यात आली. तेव्हापासून आसपासच्या तीस गावांमध्ये ही वाघिण धुमाकूळ घालत होती. या वाघिणीने मानव प्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने आदिवासी भयभीत झाले होते. या वाघिणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-1 वाघिणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला आहे. आधीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसनावरून आदिवासी व वनविभागामध्ये तेढ झाली असताना  ई-1 वाघिणीच्या वाढत्या धुमाकुळाने आदिवासींमध्ये असंतोष वाढीस लागला होता. 

3 जुलै रोजी केकदाखेडा येथील सात वर्षीय मुलीवर या वाघिणीने हल्ला केला. 6 जुलै रोजी कावडाझरी येथे एक म्हैस ठार करूण रखवालदारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 12 जुलै रोजी तंबोली येथील महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. 19 जुलै रोजी तीन शेळ्या फस्त केल्या. 23 ऑगस्ट रोजी धोदरा गावात 4 शेळ्या फस्त केल्या तर तीन जखमी केल्या. 26 ऑगस्ट रोजी बीबामल गावाच्या परिसरात दोन गायीसह दोन वासरे फस्त केली तथा तीन बैलांना जखमी केले. वाघिणीचा बंदोबस्त करावा तिला मेळघाट वन्यक्षेत्राबाहेर सोडण्यात यावे अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली होती. तसेच त्यांनी यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. 

 

Web Title: E one tigress in Melghat Tiger Reserve Forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.