दोन हजार लोकसंख्येच्या गावांना ई-प्रॉपर्टी कार्ड
By admin | Published: April 8, 2017 12:10 AM2017-04-08T00:10:58+5:302017-04-08T00:10:58+5:30
भूमिअभिलेख विभागाच्यावतीने जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जात आहे.
भूमिअभिलेखचा उपक्रम : १८ कोटी रुपये खर्च
अमरावती : भूमिअभिलेख विभागाच्यावतीने जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जात आहे. मात्र या कार्डच्या बनावट आणि चुकीच्या नोंदी होत असल्याने येत्या काळात ई- प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाणार आहे. त्याकरिता १८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
ई- प्रॉपर्टी कॉर्ड वाटप करण्यासंदर्भाचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. या उपक्रमाला मान्यता प्रदान करावी, असे या प्रस्तावात महटले होते. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या समितीने ई प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यासाठी १८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. बनावट व चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी ई- फेरफारनंतर आता ई- प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई- फेरफारनंतर १५ दिवसांत दस्तऐवजांच्या आॅनलाईन नोंदी घेतल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याची तरतूद आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोन हजार लोकसंख्येच्या गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाने हाती घेतले आहे. अमरावतीसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा उपक्रम भूमिअभिलेख विभागाने सरू केला आहे.
बनावट नोंदीला आळा
अमरावती : आतापर्यंत राज्यात ५४ लाख ५८ हजार मिळकती पत्रिका तयार करून त्याचे वाटप करण्यात आले आहे. शहरात मिळकतीची खरेदी- विक्री केल्यास त्याचे प्रॉपर्टी कार्डवर नोंद करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागते. त्यामुळे होणारा विलंब लक्षात घेता ई-प्रॉपर्टी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास बनावट आणि चुकीच्या नोंदींना आपोआपच आळा बसणार आहे. ‘ई- प्रॉपर्टीे कार्ड आॅफ ईन्फर्मेशन सिस्टीम’ प्रणाली तयार करण्याचे काम ‘महाराष्ट्र ईन्फर्मेशन टेक्नालॉजी कार्पोरेशन लिमीटेड’कडे सोपविण्यात आले आहे.