लोणार अभयारण्यात ई-सर्व्हिलन्स कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:34 AM2020-06-17T11:34:34+5:302020-06-17T11:37:12+5:30

लोणार सरोवरासह अभयारण्यातील वन्यजीवनांचे संरक्षण व संवर्धनची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागाकडे आहे. लोणार अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे.

E-surveillance cameras at Lonar Sanctuary | लोणार अभयारण्यात ई-सर्व्हिलन्स कॅमेरे

लोणार अभयारण्यात ई-सर्व्हिलन्स कॅमेरे

googlenewsNext
ठळक मुद्दे गुलाबी पाण्याकरिता परवानगी अनिवार्य अभयारण्यात तीन मद्यपींना अटक

अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोला वन्यजीव विभागातील लोणार अभयारण्यात ई-सर्व्हिलान्स कॅमेरे लावण्यात आले आहेत. लोणार सरोवरातील पाणी व अभयारण्याचे संरक्षण करण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरत आहेत. कंट्रोल रूममध्ये बसून या कॅमेऱ्यांच्या मदतीने माहिती मिळविली जात आहे.
लोणार अभयारण्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. या लोणार सरोवरासह त्या परिसरातील वन्यजिवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. मेहकर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी त्या परिसरात गस्तीवर आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी झाल्यामुळे, याठिकाणी कुणीही विना परवानगी येऊ नये, यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. लोणार सरोवरातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत आहेत. या पाण्याचे नमुने घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. विनापरवानगी पाणी घेण्याचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा असून, ते पाणीदेखील धोकादायक असल्याचे अकोला वन्यजीव विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पिलांसह बिबट्याचे वास्तव्य
या लोणार अभयारण्यातील लोणार सरोवरासह लगतच्या परिसरात बिबट आपल्या दोन पिलांसह वावरत आहे. त्यामुळे तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, लोणार अभयारण्य लॉकडाऊनमुळे बंद आले. अशातही तिघांनी आत प्रवेश करीत मद्यपान केले. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षकांनी या मद्यपींना १३ जून रोजी रंगेहाथ पकडले. यात मद्यपी वासुदेव सुरडकर, योगेश सोनाग्रे व सोपान थोरात (तिघेही रा. अटाळी, ता. खामगाव) यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ ते कलम २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोणार सरोवरासह अभयारण्यातील वन्यजीवनांचे संरक्षण व संवर्धनची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागाकडे आहे. लोणार अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे. तलावातील गुलाबी पाणी मिळविण्यासाठी, या पाण्याचे नमुने घेण्यासाठी अकोला वन्यजीव विभागाची रीतसर परवानगी आवश्यक आहे.
- मनोजकुमार खैरनार,
विभागीय वनअधिकारी,
अकोला वन्यजीव विभाग, अकोला.

Web Title: E-surveillance cameras at Lonar Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.