अचलपूर तालुक्यात ‘ई’ टेंडरींग घोटाळा
By admin | Published: March 4, 2016 12:14 AM2016-03-04T00:14:57+5:302016-03-04T00:14:57+5:30
राज्य व केंद्र शासनाचा लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतीत करण्यात आल्यावर ग्रामपंचायतीमार्फत निविदा ‘ई-टेंडर’ प्रणालीनुसार काढण्याचे आदेश आहेत.
चौकशीचे आदेश : सचिव-कंत्राटदाराचे साटेलोटे, संगणक संचालकांची साथ
परतवाडा : राज्य व केंद्र शासनाचा लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतीत करण्यात आल्यावर ग्रामपंचायतीमार्फत निविदा ‘ई-टेंडर’ प्रणालीनुसार काढण्याचे आदेश आहेत. ती सुविधा पारदर्शीपणे न करता त्यालाच हाँग करीत अचलपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये संगणक संचालक, सचिव कंत्राटदाराच्या मदतीने मर्जीप्रमाणे वापर सुरू असल्याची तक्रार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अचलपूर तालुक्यात पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती बांधकामासह इतर कामांसाठी शासन नियमानुसार ‘ई-टेंडर’ प्रणालीद्वारे कामाचे कंत्राट देणे बंधनकारक आहेत. मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत संगणक केंद्रावरून हे सर्व शासकीय कामे होत असल्याची तक्रार दस्तुरखुद्द पंचायत समिती सदस्या प्रीती प्रवीण गाडगे यांनी केल्याने सचिव, संगणक संचालक, कंत्राटदार व काही कमीशन घेऊन या कार्याला साथ देणाऱ्या सरपंचांचे पितळ उघडे पडले आहे.
ई-टेंडर प्रणालीनुसार सरपंच व सचिव यांची डिजिटल स्वाक्षरी संगणक संचालकाकडे आहे. निविदा प्रक्रिया राबविताना कुठल्या कंत्राटदाराने कुठल्या दराने ती भरली आदी सर्व बाबी गोपनीयतेचा भाग आहे. मात्र ग्रामपंचायतअंतर्गत संगणक संचालक व कंत्राटदार या गोपनीयतेचा भंग करीत सचिव व काही सरपंचांना हाताशी धरून मर्जीतील कंत्राटदारांना ती माहिती पुरवीत असल्याची तक्रार प्रीती गाडगे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केली आहे. परिणामी मर्जीतील कंत्राटदार व कमीशनखोरीमुळे कामाचा दर्जा खालावला असल्याचे चित्र आहे.
ई-टेंडर प्रक्रिया राबविणारे संगणक संचालक रात्री-बेरात्री मर्जीनुसार या प्रणालीचा वापर स्वहितासाठी करीत आले आहेत. दुसऱ्या कंत्राटदारांचे दर मर्जीतील कंत्राटदाराला दाखवून शासन नियमांचा भंग संपूर्ण तालुक्यात खुलेआम सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)