शहरात पहिल्यांदाच ई-टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:48 PM2018-04-17T23:48:00+5:302018-04-17T23:48:35+5:30
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना, आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असताना, आता शहरात स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. शहरात तीन ठिकाणी सहा ई-टॉयलेट लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
शहरातील एका स्वयंसेवी संस्थेशी याबाबत महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. या संस्थेला ई-टॉयलेट बसविण्यासाठी चित्रा चौक, सबनिस फोटो स्टुडिओ व सियाराम शोरूमजवळ राजापेठ येथे जागा देण्यात येणार आहेत. ती संस्था या तीन ठिकाणी स्वखर्चाने ई-टॉयलेट उभारेल. त्यानंतर वीज, पाणी व निचऱ्याचा खर्च महापालिका उचलेल. ई-टॉयलेटची उभारणी पूर्ण झाली की ते ‘पे अँड यूज’ तत्त्वावर अन्य एजन्सीला चालवायला दिले जाईल. शहरात पहिल्यांदाच महापालिका यंत्रणेने ई-टॉयलेट उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही या ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये आहेत. अमरावतीत प्रथमच अशी ई-टॉयलेट उभारली जाणार आहे.
असे आहेत ई-टॉयलेट
एका ई-टॉयलेटची किंमत साडेतीन ते साडेआठ लाख रुपयांपर्यंत आहे. पे अँड यूजच्या धर्तीवर त्यांचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर प्रसाधनगृहाचा वापर करता येईल. या टॉयलेटसाठी ४५ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. पाचशे लिटर पाणी त्यात साठविलेले असते तसेच एका वेळी दीड लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे ई-टॉयलेट स्वच्छ व यूजर फ्रेंडली असतात.
पर्यावरणच्या दृष्टीने उपकारक
ई-टॉयलेटचा दरवाजा उघडताच आतील दिवे आणि एक्झॉस्ट फॅन सुरू होऊन आपोआप पाणी फ्लश होते. बाहेर पडल्यावरही सेन्सर तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा संपूर्ण शौचालय स्वच्छ होते. या स्वयंचलित शौचालयात बेसीनदेखील असेल. ई-टॉयलेट ही संकल्पना तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्वच्छ भारत अभियानादरम्यान शहर स्वच्छतेकडे हे एक पाऊल आहे.
ई-टॉयलेटसंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेशी एमओयू करण्यात आला आहे. त्यासाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्यात. लवकरच ई-टॉयलेटची उभारणी होईल.
- हेमंतकुमार पवार, आयुक्त