लवकरच छापील शैक्षणिक प्रश्नपत्रिका होणार इतिहासजमा; मोबाइल अॅपवर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:38 PM2017-12-28T14:38:44+5:302017-12-28T14:39:09+5:30
भविष्यात प्रश्नपत्रिका हार्ड नव्हे तर सॉफ्ट कॉपीमध्ये असेल, असे नवे अॅप विकसित करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपची हाताळणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना आता कागदावरील प्रश्नपत्रिका इतिहासजमा होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात प्रश्नपत्रिका हार्ड नव्हे तर सॉफ्ट कॉपीमध्ये असेल, असे नवे अॅप विकसित करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपची हाताळणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे.
प्रश्नपत्रिका छपाईसाठी दरवर्षी हजारो कोटींचा खर्च लागतो. कागदाचा वापर होत असल्याने त्यासाठी लाकूड वापरले जाते. वनांचा ऱ्हास होण्यास ही बाब कारणीभूत मानली जात आहे. मात्र, एका मोबाइल अॅपमुळे कागद व पैशाचा अपव्यय वाचणार आहे. नोएडा स्थित एमजीएम महाविद्यालयाने एक आॅनलाइन क्वेश्चन डिस्ट्रिब्यूशन अॅप विकसित केले आहे. विशेषत: या प्रकल्पासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उत्सुकता दर्शविली आहे. सध्याच्या परीक्षा प्रणालीत मोबाइल वापरता येत नाही. कारण विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, अशी त्यामागे नियमावली आहे. मात्र, नव्या अॅपमुळे विद्यार्थी परीक्षेला मोबाइल घेऊन येऊ शकतील. मोबाइल स्क्रिनवर प्रश्नपत्रिका पाहून परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये उपलब्ध करून दिलेल्या उत्तरपत्रिकेवर प्रश्न सोडवावे लागेल. पेपरचा निर्धारित कालावधी संपताच परीक्षार्थींचा मोबाइल सर्व्हरशी आपोआप डिस्कनेक्ट होईल. परंतु, प्रश्नपत्रिका सेव्ह झालेली असेल.
असे राहणार नवे मोबाइल अॅप
आॅनलाइन क्वेश्चन डिस्ट्रिब्यूशन अॅपचा वापर अत्यंत कुशल पद्धतीने करता येईल. प्रथम परीक्षार्र्थींना मोबाइलवर एक वेब लिंक पाठवून त्या मोबाइलला सेंट्रल सर्व्हरशी कनेक्ट करावे लागेल. विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये पोहोचताच त्याला मोबाइलवर कोड पाठवला जाईल. या कोडला सर्व्हरच्या वेब लिंकमध्ये टाकताच मोबाइल सर्व्हरशी कनेक्ट होईल. त्यानंतर मोबाइलवर अॅप अॅक्टिव्ह होताच उर्वरित सुविधा आपोआप ब्लॉक होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाइल स्क्रिनवर केवळ प्रश्नपत्रिकाच दिसेल. पेपर संपेपर्यंत अन्य सेवा मोबाइलवर बंद होतील.
विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा प्रणालीत आमूलाग्र बदल केले आहेत. आॅनलाइन कारभारावर अधिक भर आहे. भविष्यात अॅपद्वारे मोबाइलवर प्रश्नपत्रिका मिळेल. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
- जयंत वडते
संचालक, परीक्षा व मूल्यांकन