प्रथमेशच्या पायाखालची उचलली होती माती !
By admin | Published: August 21, 2016 11:53 PM2016-08-21T23:53:31+5:302016-08-21T23:53:31+5:30
नरबळीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे गळा चिरणाऱ्या सुरेंद्रने अघोरी पुजेसाठी घटनेच्या सात दिवसांपूर्वीच प्रथमेशच्या पायाखालची माती उचलली होती.
'सावजा'वर नजर : गळा चिरल्यावर रक्तात कालवून केली पूजा
अमरावती : नरबळीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे गळा चिरणाऱ्या सुरेंद्रने अघोरी पुजेसाठी घटनेच्या सात दिवसांपूर्वीच प्रथमेशच्या पायाखालची माती उचलली होती.
श्री संत शंकर महाराज मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविण्यात आली होती, तो अंधश्रद्धाळू सुरेंद्र शांत डोक्याने प्रथमेशच्या मागावर होता.
कुणाच्यातरी पोटचा गोळा असलेला गोंडस प्रथमेश हा सुरेंद्रसाठी केवळ बळी देण्यासाठीचे चालते बोलते सावज होता. कसायाच्या गोठ्यातील खुंटीला बांधलेला बकरा जसा गरज पडेल तेव्हा कापला जाण्यासाठीच असतो, तसाच आश्रम परिसरात खेळणारा-बागडणारा प्रथमेश बळी देण्यासाठीच राखून ठेवला आहे, असा दृष्टिकोन सुरेंद्रचा होता. योग्य दिवशी नरबळी देण्यापूर्वी अघोरी विद्येच्या देवतेला हा प्रसाद प्रसन्न करणारा ठरावा, यासाठी तो प्रथमेशवर मंत्रतंत्र आजमावत होता.
प्रथमेशच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून असलेल्या सुरेंद्रने प्रथमेश आश्रम परिसरात वावरत असताना त्याच्या पायाखालची माती उचलली होती. प्रथमेशचा स्पर्श झालेली माती विशिष्ट पद्धतीने भारली गेली तर त्याचा परिणाम प्रथमेशवर होतो, अशी अंधश्रद्धा सुरेंद्रची होती. घटनेच्या अर्थात् नागपंचमीच्या सातेक दिवसांपूर्वी सुरेंद्रने ही माती गोळा केली होती. त्या मातीची त्याने त्याचा विश्वास असलेल्या विधीप्रमाणे पूजा केली. काळी विद्या प्रदान करणाऱ्या देवतेला आवाहन करून करण्यात आलेली ही अघोरी पुजा नरबळी कबूल व्हावा आणि शक्तीप्राप्ती व्हावी, यासाठी होती.
नागपंचमीच्या दिवशी प्रथमेशचा गळा तीनवेळा ब्लेड फिरवून चिरल्यानंतर प्रथमेशच्या शरीरातून जे रक्त निघाले, त्या रक्ताने सुरेंद्रने अंग माखलेच शिवाय प्रथमेशच्या पायाखालची जी माती त्याने मंत्रोच्चाराने भराल्याची त्याची अंधश्रद्धा होती, त्या मातीतही ते रक्त मिसळले. रक्त मातीत कालवल्यानंतर त्या मातीची त्याने पुन्हा विधीनुसार पूजा केली. विशिष्ट मंत्रांचे उच्चारण करून त्याने त्याच्या अघोरी देवतेच्या जागरणाचे आवाहन केले. कुठल्याही भयाविना त्याने शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात हे कृत्य केले.
सर्वांचाच राबता तरीही नरबळी !
सुरेंद्र हा प्रथमेशवर लक्ष ठेवून होता. माती गोळा करणे, त्यावर पूजा करणे आदी प्रकार तो त्याच्या आश्रम परिसरातील अधिकृत वास्तव्यादरम्यान करीत होता. सामान्यपणे कुणी त्याच्या कार्याशिवाय इतर कार्यात सातत्याने सक्रीयरीत्या सहभागी असेल तर ती बाब काही दिवसांत लक्षात येते. त्यालाच प्रशासन, व्यवस्थापन असे म्हणतात. येथे तर सुरेंद्र नरबळीसाठी झपाटलेला होता. त्याचे वागणे अर्थात्च खटकणारे, लक्ष वेधणारे असणार! आश्रमात अनेक भक्तांचा नियमित वावर असतो. शिक्षक आणि देखरेख करणाऱ्यांचाही वावर नेहमीचाच. सुरेंद्रचे हे वगणे यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही? वसतिगृह प्रशासन, आश्रम प्रशासन आणि व्यस्थापन यांनाही ते कसे हेरता आले नाही ?