तापी नदी प्रदेशातील भूस्तरीय हालचालींमुळे मेळघाटात भूकंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:16 PM2018-08-22T22:16:46+5:302018-08-22T22:17:40+5:30
तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडीसह आजूबाजूच्या चार गावांना मंगळवारी रात्री अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपाच्या धक्क््यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, भूकंपाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २१ आॅगस्टला हवामानशास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय चमूला माहिती दिली आणि नेमकी स्थिती समजून घेतली. परत भूकंप होणार की काय, याबाबत सांगणे शक्य नाही. याबाबत मार्गदर्शन व भूस्तरीय हालचालींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी राज्यस्तरावर संबंधित यंत्रणेला कळविल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
तापीचा भूप्रदेश संवेदनशील
मेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदीच्या भूप्रदेशात साद्राबाडी हे गाव वसले आहे. तापी नदीच्या परिसरातील भूगर्भातील ज्या प्लेट्स आहेत, त्यात हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.
म्हणून झाली नाही नोंद!
भूकंपाची तीव्रता अडीच रिश्टर स्केलपेक्षा जास्त असेल, तरच भूकंपमापक केंद्रावर त्याची नोंद होते. त्यामुळे २१ आॅगस्टला झालेल्या भूकंपाची नोंद झालेली नाही, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर केंद्राचा अहवाल असल्याचे धारणीचे तहसीलदार अभिजित गांजरे यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.
नागरिकांनी भूकंपाच्या वेळी त्यांना काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणे गरजेचे आहे. भूकंपाची तीव्रता किती आहे, भूकंपाबाबत भाकित होऊ शकते का, याची माहिती आम्ही आयएमडीकडून मागवित आहोत. ती उपलब्ध होताच उपाययोजना त्वरेने केल्या जातील.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी