३ जानेवारीला पृथ्वीचे सूर्यापासून सर्वांत कमी अंतर; खगोलतज्ज्ञांची माहिती
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 29, 2023 08:28 PM2023-12-29T20:28:42+5:302023-12-29T20:29:13+5:30
मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट परिणाम नाही
अमरावती : पृथ्वी सूर्याभोवती फिरते; परंतु अचूक वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही तर लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असते. कधी सूर्यापासून लांब असते, तर कधी सूर्यापासून जवळ असते. साधारणपणे ३ जानेवारीदरम्यान पृथ्वी ही सूर्यापासून सर्वांत कमी अंतरावर असते. हे अंतर १४.७१ कोटी कि.मी. राहत असल्याची माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली.
नेहमी हे अंतर सरासरी १५ कोटी किमीदरम्यान असते. या दिवशी पृथ्वी जुलै महिन्याच्या तुलनेत ५० लाख कि.मी.ने सूर्याच्या जवळ राहणार आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यातील अंतर कमी असण्याच्या घटनेला ‘उपसूर्य’ असे म्हणतात. सूर्य हा तप्त वाळूचा गोळा असून यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळतो व त्यापासून ६५ कोटी २५ लाख हेलियम तयार होते.
हा शोध सन १९३९ मध्ये हॅन्स बेथ या वैज्ञानिकाने लावला. सूर्यावर ज्या भागावर तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध सन १९८३ मध्ये श्वाबे नावाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे
सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती एक चक्कर मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात. सूर्य हा आकाशगंगेच्या मध्याभोवती २५० किमी प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. आजपर्यंत सूर्याचे २० चक्कर पूर्ण झाले. सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आर्थर एडिंग्टन आहेत. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहे, त्यापैकी पाच अब्ज वर्षे संपले आहेत. म्हणजेच पाच अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत व बटू ताऱ्यात होईल.