मिठाई खा, पण जरा जपून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:23 PM2018-09-15T22:23:15+5:302018-09-15T22:23:46+5:30
गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्सव काळात चवदार मिठाईला मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी भेसळीची शक्यतासुद्धा वाढली आहे.
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्सव काळात चवदार मिठाईला मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी भेसळीची शक्यतासुद्धा वाढली आहे.
उत्सवाच्या काळात ग्राहकांकडून होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी परराज्यातून खवा अमरावतीत दरवर्षी दाखल होतो. मिठाईमध्ये रासायनिक रंग व विविध पदार्थांची भेसळ होण्याची शक्यता असते, तसेच हलक्या दर्जाची मिठाई किंवा पदार्थ ग्राहकांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चवदार मिठाई सेवन करताना नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे असते.
जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल, तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. या यामधील शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारची मिठाई विक्री होत आहे.
एका लीटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे, एक किलो खव्यासाठी पाच लीटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसांत विक्री होत आहे. म्हणजे शहरात दिवसाकाठी सरासरी १५००० किलो मिठाई विक्री होते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लीटर दुधाची गरज भासते. अमरावती व यवतमाळ जिल्हा दुग्ध संघांकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली गेली, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दुग्ध पुरवठादारांच्या माध्यमातून २६ हजार लीटर दूध संकलित करून ते जिल्ह्यातील नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जाते तसेच अनोंदणीकृत खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लीटर दूध बाजारात येते. तरीही मागणीएवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. यामुळे मिठाईमध्ये विविध प्रकारची भेसळ असण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील हॉटेलचालकांना बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातून हजारो किलो खवा येत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातून किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या खव्याकडे अन्न सुरक्षा अधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे असते.
अशी ओळखा भेसळ
भेसळ ही अनेक प्रकारची असू शकते. मिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे.
विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असू शकतात.
प्रथम खव्याचा जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.
खव्याचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याचे समजावे.
खव्याचे पदार्थ खरेदी केल्यापासून २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत खावी, असे मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय हे पहावे.
ग्राहकांना मिठाईमध्ये भेसळ आढळली किंवा फसवणूक झाली, तर प्रथम ग्राहकांनी अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. यानंतर ग्राहक न्यायालयात जाण्याचासुद्धा मार्ग मोकळा आहे. पण, या ठिकाणी नेमकी शरीराची कशी हानी झाली किंवा काय नुकसान झाले, यासंदर्भात त्यांना आपली बाजू मांडणे गरजेचे आहे.
- डॉ. अजय गाडे, संघटनमंत्री,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत
मुळात मिठाई आणि मिठाईचे मिश्र प्रकारच आरोग्यास हानीकारक आहेत. मिठाई भेसळयुक्त आणि रासायनिक रंगयुक्त असेल तर हगवण, अस्थमा आणि कर्करोगही होऊ शकतो. सण साजरे करा; पण आरोग्याची काळजीही घ्या.
- डॉ. अतुल यादगिरे,
कर्करोग तज्ज्ञ,अमरावती