नाफेड तूर खरेदीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:58 PM2018-02-28T22:58:33+5:302018-02-28T22:58:33+5:30

Eclipse to buy Nafed Ture | नाफेड तूर खरेदीला ग्रहण

नाफेड तूर खरेदीला ग्रहण

Next
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : ४ हजार ४०० अर्ज, खरेदी केवळ ७४९ शेतकऱ्यांची

आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : गत वर्षी झालेल्या तुरीच्या बंपर उत्पादनाचे पडसाद यंदाच्या तूर खरेदीवर उमटू लागले आहे. दर्यापूर बाजार समितीत नाफेड केंद्रावर साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना ७५० शेतकऱ्यांची केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केल्याचे समोर आले आहे.
पणन महासंघाच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाफेडच्या माध्यमातून २ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. परंतु मागील २७ दिवसांत नाफेडने केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केली. दररोज ४ ते ५ हजार क्विंटल तूर मार्केट यार्डमध्ये येत असताना बहुतांश तूर व्यापारी खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. नाफेडच्या ढिम्म गतीमुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. बाजार समितीच्या आवक पत्रानुसार दररोज ५ हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत.
एसएमएसही मिळत नाहीत
नाफेडच्या खरेदी प्रक्रियेनुसार ४ हजार ४०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. रोज ४० शेतकºयांना फोन वा एसएमएसद्वारे माल विक्रीस आणावा, अशी माहिती दिली जाते. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे निमित्त करून शेतकऱ्यांना माहितीच दिली जात नाही, अशी तक्रार करावी कुणाकडे असा सवाल आहे.
व्यापाऱ्यांकडे कमी दर
नाफेडमध्ये तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ४५० येवढा भाव असताना शेतकरी व्यापाऱ्यांकडे ४ हजार रुपये दराने तुरीची विक्री करीत आहे. यामुळे शेतकºयांचा प्रत्येक क्विंटल मागे सुमारे १ हजार ४५० रुपयांचे नुकसान होत आहे. नाफेड खरेदीचा क्रमांक कधी लागेल, याची शाश्वती नसल्याने हाती पैसा यावा, यासाठी असा निर्णय घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
खरेदी मर्यादा एकरी चार क्विंटल
तूर खरेदीच्या मर्यादा ठरवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. खरेदी मर्यादा केवळ ४ क्विंटल आहे. सुरुवातीला ही मर्यादा एकरी दोन क्विंटल होती. परंतु शेतकऱ्यांनी ओरड केल्याने ती वाढविण्यात आली आहे. सध्या निश्चित केलेली मर्यादादेखील कमी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे खरेदीवर परिणाम होऊ लागला आहे.
जाणीवपूर्वक खरेदी संथ
नाफेडने २ फेब्रुवारी रोजी तूर खरेदी सुरू केली. २७ दिवसांपासून केंद्र सुरू असताना या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. अशीच परिस्थिती सुरूराहिली तर नाफेडला लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागेल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: Eclipse to buy Nafed Ture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.