ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:21+5:302021-05-23T04:12:21+5:30
अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात ...
अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील किराणा, भाजीपाला यासह हॉटेल, दूध डेअरींना १५ ते २२ मार्चपर्यंत टाळे लागले होते. याशिवाय अन्य व्यवसाय तर बंद आहेत. परिणामी ग्रामीण भागातील सर्वच व्यवहार पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
लॉकडऊन व संचारबंदीमुळे पंधरा दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच भाजीपाला विक्री करता आला नाही. परिणामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची धामधूम आर्थिक अडचणीमुळे रखडून पडली होती. अशातच कापड, बिल्डींग मटेरियल, जनरल स्टोअर व अन्य छोटे मोठे व्यवसाय तर बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे अजूनच विस्कळीत झाली आहे. गावपातळीवर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय दक्षता समिती कार्यरत आहे. या समितीला गावस्तरावर विनामास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकारी प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी कोरोनाचे रुग्ण मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागातच अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णही कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकणार नाही. पर्यायाने विस्कळीत झालेली आर्थिक घडीही रूळावर येऊ शकणार नाही.
बॉक्स
दंडात्मक कारवाईचा बडगा
कुठलेही कारण नसताना विनाकारण घेणाऱ्यांवर तसेच चौकात उभे राहून गर्दी करणाऱ्यावर ग्राम दक्षता समितीमार्फत ‘वॉच’ ठेवला जात आहे. या समितीला दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. त्यानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.