उन्नत अभियानाद्वारे उंचावणार शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:32 PM2018-05-02T23:32:58+5:302018-05-02T23:32:58+5:30
प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, नैसर्र्गिक आपत्तीमध्ये पिकांचा बचाव होण्यासाठी पीकविम्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
यंदाच्या हंगामापासून कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी तालुका हा घटक गृहित धरण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी पिकांचे वैविध्यकरणाद्वारे उत्पादनखर्च कमी करणे. शेतमालाच्या बाजारभावातील नियमित चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे. शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे. बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने शेतकºयांच्या उत्पादक कंपन्यांची व्यावसायिक क्षमता बांधणी करणे. काढणीपश्चात शेतमाल हाताळणी व शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, यावर यावर्षीच्या खरीप व रबी हंगामामध्ये भर राहणार आहे.
ज्या तालुक्यातील प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे त्या पिकांसाठी हमीभावानुसार प्राप्त होणारे उत्पन्न हे शेतकºयाने घेतलेल्या पीक कर्जापेक्षा प्रत्यक्षात जास्त असावे, यासाठी तालुक्यांना त्या पिकांसाठी २० टक्के वाढीव उत्पादकतेचा लक्षांक देण्यात यावा असे, कृषी आयुक्तालयाने बजावले आहे. दरम्यान हा उपक्रम खरिपामध्ये राबविण्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू आहे.
आता १० हेक्टरमध्ये पीक प्रत्यक्षिक
यापूर्वी १०० हेक्टर अशा विखुरलेल्या क्षेत्रावर पीक प्रत्यक्षिक करण्यात येत होती. त्यामुळे शेतकºयांशी नियमित संवाद साधण्यामध्ये बाधा येऊन कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये अडचणी यायची. त्यामुळे या हंगामापासून सर्व प्रचलित योजनांसाठी पीक प्रथ्यक्षिके ही १० हेक्टर क्षेत्र मर्यादेच घेण्यात याव व एका कृषी सहायकाकडे एका हंगामात दोन्ही हंगाम मिळून किमान ५ पाच पीक प्रत्यक्षिके राहतील, अशा सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.
तंत्रज्ञान माहीती १५ मे पूर्वी संकेतस्थळावर
कृषी विभागाच्या प्रचलीत योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी, स्थानिक पीक प्रात्यक्षिकातंर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहीती देण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ होण्यासाठी कृषी आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या संकेतस्थाळावर १५ मे २०१८ पूर्वी टाकणे बंधनकारक केले आहे.या शिवाय विविध माध्यमांच्याद्वारे ही माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहचली पाहीेजे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.