ईडी, आयकरचा ससेमिरा लावून राज्य सरकार पाडण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:47 PM2021-10-23T17:47:04+5:302021-10-23T17:49:28+5:30
Amravati News काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.
अमरावती : काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. (Dilip Walse Patil)
वळसे पाटील हे अमरावती दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमली पदार्थ तस्करीविरुद्ध राज्याचे पोलीस दल सक्षमपणे कारवाई करीत आहे. मात्र, एनसीबीने कारवाई करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जणू काही महाराष्ट्रातच अमली पदार्थ विक्री होते, असा देखावा उभा केला जात असल्याची टीकाही गृहमंत्र्यांनी केली. ईडी, आयकर हे अलीकडे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले असून, तशीच कारवाई होत आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांना लक्ष करून ईडी, आयकरचे धाडसत्र राबविले जात आहे. परंतु, गत दोन वर्षांत एकाही भाजपच्या नेत्याकडे ईडी, आयकरची नोटीस किंवा धाडसत्र का पडले नाही, असा सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले उपस्थित होते.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही
राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लागणार आहेत. त्यानुसार प्रस्ताव मागविले जातील. अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी निधीसंदर्भात चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी गैर राजकीय महिलांची नियुक्ती का नाही, या प्रश्नावर बोलताना गृहमंत्र्यांनी रूपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तर आहेतच; पण त्या कायदेतज्ज्ञही असल्याचा दुजोरा दिला.