‘एडीफाय’ नियमबाह्य, चौकशीचे आदेश

By admin | Published: June 17, 2016 12:08 AM2016-06-17T00:08:32+5:302016-06-17T00:08:32+5:30

देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित एडीफाय शाळा अनधिकृत असल्याच्या मुद्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

'Ediffy' rules out, inquiry orders | ‘एडीफाय’ नियमबाह्य, चौकशीचे आदेश

‘एडीफाय’ नियमबाह्य, चौकशीचे आदेश

Next

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : शाळा सुरूच केली नसल्याचा देवी एज्युकेशन सोसायटीचा दावा
अमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरास्थित एडीफाय शाळा अनधिकृत असल्याच्या मुद्यावरून चौकशीचे आदेश देण्यात आलेत. शुक्रवारी सायंकाळी चौकशी अहवाल प्राप्त होणार असल्याचे शिक्षण खात्याने स्पष्ट केले.
शिक्षणाचे व्यापारीकरण करता येणार नाही, असा शासनादेश आहे. या आदेशाचे सर्रास उल्लंघन करून तेलंगन्यातील सिकंदराबाद येथील एमडीएन एडीफाय एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीद्वारे अमरावतीत फ्रेंचाईसी देण्यात आली. नागरिकांना सामान्य शाळेसमान भासत असलेली एडीफाय ही शाळा फ्रेंचाईसी असल्याने धंदेवाईक प्रक्रियेचा एक भाग आहे. नागरिकांच्या डोळ्यात ती धूळफेक आहे. शासनाच्या आदेशाचा तो अवमानही आहे. त्यामुळे ही फ्रेंचाईसी तत्काळ प्रभावाने बंद करावी, अशी आर्जव पालक-बालक सेल्फ हेल्फ ग्रुपने मुख्यंत्र्यांकडे १० एप्रिल रोजी प्रत्यक्ष भेटीअंती केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशी करावी व उचित कार्यवाही करावी, असा शेरा शालेय शिक्षण संचालकांच्या नावे या तक्रारीवर नमूद केला होता. शालेय शिक्षण संचालकांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाला दुर्लक्षित केल्याने पालक-बालक सेल्फ हेल्फ ग्रुपने पुन्हा १३ जून रोजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्या कार्यालयात धडक दिली. नांदेडे यांनी एडीफाय फ्रेंचाईसीमार्फत सुरू असलेली कठोरा येथील शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांना दिले. सदर कारवाई आजच करावी, असेही नांदेडे यांनी आदेशात विशेषत्वाने नमूद केले. यानंतरही उपसंचालक एस.बी. कुलकर्णी यांनी हालचाल न केल्याने पालक-बालक ग्रुप गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धडकला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने सदर अनधिकृत शाळा बंद करण्याचे पत्र शिक्षण उपसंचालक कुलकर्णी यांना पाठविले. शिक्षण संचालकाने आपणाला यासंबंधाने यापूर्वीच आदेशित केल्याचीही आठवण जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कुलकर्णी यांना या पत्रात करून दिली आहे. कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना अतितत्काळ प्रभावाने एडीफाय फ्रेंचाईसी बंद करण्याचे आदेश जारी केले. चौकशी आणि अनधिकृत शाळेबाबत कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. शनिवारी या शाळेच्या भवितव्याचा निर्णय होईल. (प्रतिनिधी)

हॉट भेट
यासंबंधाने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ‘हॉट’ बैठक झाली. फ्रेंचाईसी कशी योग्य, हे पटवून देण्यासाठी गेलेल्या मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळची ही बैठक होती. आम्ही कुणालाही प्रवेश दिलेले नाहीत, असे शाळा व्यवस्थापनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. शाळेला सीबीएसई आणि महाराष्ट्र बोर्डाची परवानगी नसल्याचेही या बैठकीत चर्चेअंती समोर आले.

शाळा सुरूच केली नाही, तर बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांचे हे षड्यंत्र आहे. आम्ही कुठलीही फ्रेंचाईसी घेतली नाही. देवी शिक्षण संस्थेची ती एडीफाय शाळा आहे. तसेच शाळा हा व्यवसाय नसून त्याकडे सेवादृष्टीने बघितल्यास त्याचा विस्तार होईल, असे मी शाळा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशीच्या भाषणातून बोललो होतो.
- पूरण हबलानी, देवी शिक्षण संस्था

डॉ. पंजाबराव देशमुखांनी विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत शिक्षणाची जी पवित्र गंगा आणली, तिचे कुठल्याही स्थितीत व्यापारीकरण होऊ देणार नाही. तसे करणाऱ्यांचा कुठलाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. त्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची पुरेपूर तयारी आहे.
- रविकिरण पाटील, बालक-पालक ग्रुप


शाळांचा हंगाम तोंडावर आहे. अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा शाळांवर कारवाईचे शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने एडीफाय स्कूलच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार तत्काळ कारवाई केली जाईल.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी

पालकांनी मांडली भूमिका
या विषयाच्या अनुषंगाने रविकिरण पाटील, नीलेश यावलीकर, विजय जिराफे, पंकज उभाड, नितीन कुळकर्णी, श्रीकांत बाभुळकर, प्रशांत खापेकर या पालकांनी पत्रकारांसमोर एडीफाय शाळा ही कशी अनधिकृत आहे, याबाबत भूमिका स्पष्ट केली. कठोरस्थित शाळा तत्काळ बंद करण्याची मागणी केली.

शिक्षणाचा व्यापार
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शिक्षण उपसंचालक एस.बी. कुळकर्णी यांना लिहिलेल्या पत्रात पालकांच्या तक्रारीच्या आधारे जो मजकुर उद्धृत केला, त्यात ‘एमबीएन एडीफाय प्रायव्हेट लिमिटेड, काब्रा सिकंदराबाद (तेलंगण) या खासगी कंपनीने एडीफाय स्कूल नावाने महाराष्ट्रात शिक्षणाच्या नावावर विविध शहरात फ्रेंचाईसीच्या माध्यमातून अनाधिकृत शिक्षणाचा व्यापार सुरू केल्या’चा उल्लेख केला आहे.

शाळा नावाचा व्यापार
एडीफाय या खासगी कंपनीद्वारे शहरामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांसोबत करारनामे करुन शाळा नावाचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. किमान उत्पन्नाचे टार्गेट देऊन युनिफॉर्म, शूज, टिफिन, बॅग, स्टेशनरी इत्यादी शैक्षणिक साहित्य विक्री केली जात आहे. त्यावर कमिशनचा व्यवसाय सुरू आहे. सदर कंपनीने जाहिरात देतानाच उत्तम उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय, असा उल्लेख करुन फ्रेंचाईसीसाठी अर्ज मागविले होते, असा आरोप ‘बालक-पालक’चा आहे.

Web Title: 'Ediffy' rules out, inquiry orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.