प्राध्यापकांच्या वेतनासाठी शिक्षणमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:08 PM2018-07-22T23:08:12+5:302018-07-22T23:08:53+5:30
प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून राज्य शासनाने संपकालावधीतील ७१ दिवसांच्या रोखलेल्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने पुढाकार घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून राज्य शासनाने संपकालावधीतील ७१ दिवसांच्या रोखलेल्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने पुढाकार घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालीन प्राध्यापकांनी परीक्षांवर बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु, राज्य शासनाने ७१ दिवसांचे वेतन रोखून प्राध्यापकांवर अन्याय केला होता. हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह संचालकांना ही बाब अवगत करून दिली. महाविद्यालयीन प्राध्यापकांनी न्याय, हक्कासाठी लढा देऊ नये काय, असा सवाल शिक्षण मंचचे प्रदीप खेडकर यांनी शिक्षणमंत्र्यासह वित्तमंत्र्यांसमोर उपस्थित केला.
दरम्यान, प्राध्यापकांच्या निवेदनावर प्रतिनिधी मंडळाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली व यासंबंधात संपूर्ण प्राध्यापक वर्गात असंतोष खदखदत असल्याची कल्पना त्यांना दिली. याप्रकरणी कळीचा मुद्दा म्हणजे, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापित तक्रार निवारण समितीची सभा घेऊन सदर शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असल्यामुळे शासनस्तरावर अतितात्काळ योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित असल्याची विनंती करण्यात आली तसेच संपकालावधीत सर्व प्राध्यापकांनी त्यांचे नियमित कामच नव्हे, तर न्यायालयासमोर सादर केलेल्या शपथपत्रानुसार परीक्षांचे कामकाजदेखील वेळेत पूर्ण केल्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. ही वस्तुस्थिती ना. तावडे, ना. मुनगंटीवार यांना पटवून दिली. याप्रश्नी चर्चेसाठी अभ्यासपूर्वक व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी शिक्षक संघटना म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचास आमंत्रित करून हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. मंत्र्यांची भेट करून देण्याची महत्त्वाची भूमिका व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी निभवली.
शिष्टमंडळात शिक्षण मंचचे अध्यक्ष तसेच विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रदीप खेडकर, शिक्षण मंचचे अरूण चव्हाण, ओमप्रकाश मुंदे, राजेश गादेवार, राजेश बुरंगे, राधेश्याम चौधरी, अरुण हरणे आदींचा समावेश होता.