२५ हजारांच्या लाचप्रकरणी शिक्षण विभागाच्या लिपिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:26+5:302021-03-25T04:14:26+5:30
अमरावती : चुकीच्या प्रवर्गाची दुरुस्ती आदेशावर वरिष्ठांची स्वाक्षरी घेऊन देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत ...
अमरावती : चुकीच्या प्रवर्गाची दुरुस्ती आदेशावर वरिष्ठांची स्वाक्षरी घेऊन देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री भातकुली पंचायत समितीतील शिक्षणाधिकारी कार्यालयातून रंगेहात अटक केली.
पुंडलिक हुनासिंग जाधव (५३) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
तक्रारकर्त्याच्या पत्नीच्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून काही चूक झाली होती. या चुकीच्या प्रवर्गाची दुरुस्ती आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक पुंडलिक जाधव यांनी तक्रारकर्त्याला २५ हजारांची लाच मागितली. याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यादरम्यान २५ हजारांपैकी २० हजार रुपये जाधव यांनी यापूर्वीच स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित पाच हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २३ मार्च रोजी एसीबी पथकाने शिक्षणाधिकारी कार्यालयात सापळा रचून आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिकाला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.