ऑनलाईन शिक्षणावर राहणार शिक्षण विभागाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:35+5:302021-06-30T04:09:35+5:30
अमरावती : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्याचे नियोजन झालेले नाही. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्यात यावे, अशा सूचना ...
अमरावती : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्याचे नियोजन झालेले नाही. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने गुणवत्ता विकासाचा ध्यास घेऊन स्थानिक स्तरावर शैक्षणिक कृतीबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे की नाही, यावर शिक्षण विभागाची पर्यवेक्षीय यंत्रणा नियंत्रण ठेवणार आहे.
कोरोनामुळे सध्या शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमधील शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असली तरी त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागणार आहे. ऑनलाइन अध्यापनात जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेचा टक्का टिकून ठेवला असला तरी त्यात वाढ व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कामकाज करावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
बॉक्स
पर्यवेक्षीय यंत्रणा लक्ष ठेवून
शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील शाळाभेटीत ऑनलाइन अध्यापन, शिक्षण विभागाने गुणवत्तेविषयी दिलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी, विविध योजनांचे लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, कामकाजाचा आढावा आदी मुद्द्यांवर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख लक्ष ठेवतील. त्यानुसार आता सर्वांना काम करावे लागणार आहे.
बॉक्स
अध्यापनाबाबत सूचना
अध्यापनाचे दैनंदिन वेळापत्रक, प्रत्येक वर्गशिक्षकाने पालक बैठक घेणे, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे, ऑनलाईन व ऑफलाईन लाभार्थी विद्यार्थी नियोजन करणे, प्रत्येक वर्गाच्या व्हाॅट्सअप ग्रुप करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
बॉक्स
या माध्यमातून शिक्षण
शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दीक्षा ॲप, स्वाध्याप ॲप आणि शिक्षक मित्र आदींच्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे.
कोट
कोराेनामुळे ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती आहे. शिक्षक शाळेत नसले तरी त्यांनी घरून मुलांना अध्यापन करणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पर्यवेक्षीय यंत्रणेकडून यावर लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक स्तरावर शिक्षणाविषयक नियोजन केले आहे.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)