शिक्षण मंचचे विद्यापीठाला अभ्यास मंडळाच्या बैठकीबाबत ‘अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:16+5:302021-09-05T04:17:16+5:30
वर्षानुवर्षे अभ्यासक्रमांची फेररचना आणि परीक्षक नियुक्ती एवढे कार्यक्षेत्र, अनेक जबाबदाऱ्या आणि अधिकारांकडे अभ्यास मंडळांचे दुर्लक्ष अमरावती : संत गाडगेबाबा ...
वर्षानुवर्षे अभ्यासक्रमांची फेररचना आणि परीक्षक नियुक्ती एवढे कार्यक्षेत्र, अनेक जबाबदाऱ्या आणि अधिकारांकडे अभ्यास मंडळांचे दुर्लक्ष
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचद्वारे विद्यापीठ प्रशासनाला अभ्यास मंडळाच्या बैठकींबाबत दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि एकरूप परिनियम भाग ४ कलम ४१ अन्वये अभ्यास मंडळांच्या एका वर्षात किमान चार बैठकी होणे आवश्यक आहे. त्यांचे पालन होत नसल्याची बाब विद्यापीठाच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आली होती. विद्यापीठाने सर्व अभ्यास मंडळांच्या बैठकीचे तात्काळ आयोजन करावे, अशी मागणी शिक्षण मंचने केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० पासून विद्यापीठाचे काम ठप्प झाले, असे प्रशासानाद्वारे सांगण्यात येत आहे. सीबीसीएस प्रणाली लागू करण्याची कार्यवाही सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करून यासाठी ४ डिसेंबर २०२० च्या सभेतील निर्णयानुसार कुलगुरूंनी गठित केलेल्या उपसमितीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अभ्यास मंडळ बैठका घेता येतील, असा सूर विद्यापीठाने आळवला आहे. अशावेळी अनेक जबाबदाऱ्या असलेल्या अभ्यास मंडळांच्या अधिकारांचे हनन होत असल्याचा मुद्दा शिक्षण मंचने उपस्थित केला. अभ्यासक्रमाशी निगडीत कार्यकक्षेच्या बाहेर निघून अभ्यास मंडळांच्या माध्यमातून अनन्यसाधारण काम होईल. त्यामध्ये दैनंदिन अत्याधुनिक विकास आणि नवनवीन अध्ययन क्षेत्रांचा अभ्यास करून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम असणारे डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्राम सुचविणे. अभ्यासक्रमातील तसेच परीक्षा पद्धतीमधील अत्यावश्यक बदल तात्काळ अमलात आणणे. विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका सेटर, व्हॅल्यूअर, मॉडरेटर यांच्या याद्या अद्ययावत करणे. ओरिएन्टेशन, रिफ्रेशर नियोजन सुचविणे. अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम सुचविणे, औद्योगिक आणि सामजिक क्षेत्रातील गरजा ओळखून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सुधारणा सुचविणे. संस्थांतर्गत सहयोगाने विशेष कार्यक्रमांचे नियोजन सुचविणे. आयसीटी आणि पार्टिसिपेटरी अध्यापनाच्या संधी सुचविणे. कौशल्य विकसनाच्या दृष्टीने अभ्यास करून नवनवीन उपक्रम सुचविणे. स्वयं रेगुलेशनच्या अनुषंगाने पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमांची निवड करून सुचविणे आणि मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचविणे यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास मंडळांनी योगदान देणे अपेक्षित आहे, असे एका निवेदनातून सुचविण्यात आले आहे.
बॉक्स
अभ्यास मंडळांच्या कार्यकक्षा विस्तारणे आवश्यक आहे. यादृष्टीने विद्यापीठाने सर्व अभ्यासमंडळाच्या बैठकीचे तत्काळ आयोजन करावे व विविध बाबी विषय सूचीवर घ्याव्या. ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने वर्षातून किमान चार बैठकी आयोजित व्हायलाच हव्या.
- प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच