शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रोखले
By admin | Published: January 20, 2015 10:29 PM2015-01-20T22:29:33+5:302015-01-20T22:29:33+5:30
माध्यमिक शिक्षणधिकारी व धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास कुचराई केल्याप्रकरणी या दोनही
अमरावती : माध्यमिक शिक्षणधिकारी व धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास कुचराई केल्याप्रकरणी या दोनही अधिकाऱ्यांचे माहे जानेवारीचे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा जिल्हाधिकारी यांनी १६ जानेवारी रोजी आढावा बैठक घेतली असता, यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ० ते ५ किलोमिटरपर्यंत राहत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी यांच्याकडून जलदगतीने होत नसल्याचे निदर्शनास आले. जोपर्यंत या कामात समाधानकारक प्रगती होणार नाही, तोपर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे माहे जानेवारीचे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. तर तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी व औषधोपचार करणे या योजनेंतर्गत माहे डिसेंबर २०१४ धारणी तालुक्यातील १२ शिबिराचे उद्दिष्टे देण्यात आले होते. मात्र केवळ पाच शिबिरे घेण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनांची कारवाई योग्य होत नसल्याने धारणी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी एस.बी. जोगी याचेही माहे २०१५ चे वेतन तात्पुरत्या स्वरुपात रोखण्याचे आदेश देण्यात आले. जानेवारी महिन्यात शिबिराचे उद्दिष्टे पूर्ण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या सर्व कामाचा दोन्ही अधिकाऱ्यांना अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.