शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह शिक्षकांची वेतनवाढ रोखली
By admin | Published: January 19, 2016 12:07 AM2016-01-19T00:07:10+5:302016-01-19T00:07:10+5:30
राज्याचे गृहराज्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कामकाजमंत्रीे रणजीत पाटील यांनी सोमवारी महापालिका शिक्षण विभागाला आकस्मिक भेट दिली.
महापालिकेत १९ जणांना कारणे दाखवा : गृहराज्यमंत्र्यांची शिक्षण विभागाला भेट
अमरावती : राज्याचे गृहराज्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कामकाजमंत्रीे रणजीत पाटील यांनी सोमवारी महापालिका शिक्षण विभागाला आकस्मिक भेट दिली. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांसह शिक्षक, कर्मचारीच गैरहजर असल्याचे ना. पाटील यांच्या निदर्शनास आले. शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार बघून ना. पाटील यांनी संबंधितांची वेतनवाढ व सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे निर्देश दिलेत.
ना. पाटील सोमवारी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांनी स्थानिक अंबापेठ स्थित महापालिका शाळा, शिक्षण विभागाला भेट दिल्यानंतर येथील वस्तुस्थिती बघून ते अवाक झाले. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी सारेच गायब. महापालिका प्रशासनाचा कारभार कसा चालतो तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित करून ना. पाटील यांनी शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले. ना. पाटील यांनी शिक्षण विभाग, शाळांना भेट दिल्याचे कळताच महापौरांच्या बैठकीतून उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील तडकाफडकी शिक्षण विभागात कसेबसे पोहोचले.
कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासली
अमरावती : ना. पाटील यांनी त्यांना शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तके तपासली असता एकूण १९ कर्मचारी वेळेत पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले. ना. पाटील यांच्या भेटीनंतर शिक्षण विभागाचा अफलातून कारभार उपायुक्त औगड, पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासला असता वास्तव त्यांच्या लक्षात आले. ना. रणजित पाटील यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनवाढी रोखून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे निर्देश उपायुक्तांना दिले. त्यानुषंगाने उपायुक्त चंदन पाटील यांनी शिक्षण विभागाशी संबंधित १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या कारवाईने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ना. रणजित पाटील यांनी महापालिका क्षेत्रात कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडल्याने चर्चांना सोमवारी उधाण आले होते.
शिक्षणाधिकाऱ्यांचा राजीनामा अर्ज
ना. पाटील शिक्षण विभागाची झाडाझडती घेत नाहीत तोच शिक्षणाधिकारी वाकोडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पाठविला. वाकोडे हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. आयुक्त गुडेवार यांनी केलेल्या पदभरतीत त्यांच्यावर शिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपविली होती. मात्र, वाकोडे यांनी शिक्षणाधिकारी पदापासून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. वाकोडे यांच्या राजीनामा अर्जावर प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, हे विशेष.
यांना बजावल्या कारणे दाखवा
सोमवारी ना. पाटील यांनी शिक्षण विभागात धाड टाकून गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दिवाकर लाकडे, संजय वडुरकर, क्षमा कुसरे, दीपक मोंढे, भारत वाघमोडे, योगेश राणे, सुषमा दुधे, दीपाली थोरात, धीरज सावरकर, स्मिता रामटेके, वैशाली सोळंके, सोनिया पवार, कैलास कुलूट, मोरेश्वर चव्हाण, उज्ज्वल जाधव, सुजाता राजनकर, गिरीश लाकडे, कुमुदिनी देवडे व संगीता मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
सोमवारी महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयात भेट दिली असता बहुतांश अधिकारी, कर्मचारी व शिक्षक गायब असल्याचे निदर्शनास आले. हजेरी पुस्तक तपासले तर स्वाक्षऱ्या नव्हत्या. कर्मचारी गायब असल्याचे सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात कैद झाले आहे. दोन वेतनवाढी रोखून सेवापुस्तिकेत नोंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-रणजित पाटील, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र