परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरला

By admin | Published: April 19, 2015 12:17 AM2015-04-19T00:17:44+5:302015-04-19T00:17:44+5:30

राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओचा कारभार दलालमुक्त असे बघितलेले स्वप्न केवळ स्वप्नच राहिले असून पुन्हा दलालांची गर्दी वाढली आहे.

The effect of the Transport Commissioner was overturned | परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरला

परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरला

Next

आरटीओत दलालांची झुंबड : नागरिकांची लूट करण्याचा मार्ग मोकळा
अमरावती : राज्याचे परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओचा कारभार दलालमुक्त असे बघितलेले स्वप्न केवळ स्वप्नच राहिले असून पुन्हा दलालांची गर्दी वाढली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आरटीओत दलालांना दिलासा मिळाला असला तरी परिवहन आयुक्तांचा प्रभाव ओसरल्याचे वास्तव आहे.
परिवहन आयुक्त झगडे यांनी चार महिन्यांपूर्वी आरटीओंचा कारभार दलालमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दलालांना पिटाळूनदेखील लावले होते. आटीओंच्या कारभाराचे शुद्धिकरण सुरु केले असता काही परवानाधारक दलालांनी परिवहन आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निर्णय देताना आरटीओत परवानाधारक असलेले दलाल हे बेरोजगार असून त्यांना रोजगाराचे साधन म्हणून परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगार हिसकावणे संयुक्तिक नाही, असा निर्णय दिला. या निर्णयाने परवानाधारक दलालांना मोठा दिलासा मिळाला, हे वास्तविक आहे. मात्र येथील प्रोदशिक परिवहन कार्यालयात केवळ तीनच परवानाधारक दलाल असल्याची धक्कादायक माहिती आहे. सुमारे ३५० ते ४०० दलाल येथे आरटीओंशी संबंधित कामे करीत असल्याचे दिसून येते. न्यायालयाने दिलेला निर्णय हा परवानाधारक दलालांसाठी असताना याचा लाभ आता अनधिकृत दलाल मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परिवहन आयुक्त झगडे यांनी दलालांच्या वाढत्या गुंडगर्दीला लगाम लावण्यासाठी दलालमुक्त आरटीओंचा कारभार करण्याचे ठरविले होते. या निर्णयाला अनेकांनी डोक्यावरदेखील घेतले होते. परंतु परवानाधारक दलालांचा आडोशा घेत उच्च न्यायालयात याचिका सादर करून परिहवन आयुक्तांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचे दिसून येते. उच्च न्यायालयाने दलालांच्या बाजूने निकाल देताच हल्ली आरटीओत नागरिकांपेक्षा दलालांची संख्या अधिक आहे. कामकाजासाठी कोणी व्यक्ती येथे आले की त्याला प्रवेशद्वारावरच घेरले जातात. वाहन चालविण्याचा परवाना, नूतनीकरण, टॅक्स भरणे, फिटनेस, परमीट अशा विविध नावांची यादी हल्ली दलाल वाचत असल्याने कामानिमित्त आलेली व्यक्ती गोंधळून जाते. न्यायालयाच्या निकालापूर्वी परिवहन प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांचे दलालांवर अंकुश होते. मात्र या निकालानंतर दलाल हे अधिकाऱ्यांवर ‘लय भारी’ झाल्याचे चित्र आहे. केवळ तीनच परवानाधारक दलाल असतील तर ४०० अनधिकृत दलाल कसे काम करतात? हा विषय गंभीर आहे. दर दिवसाला अनधिकृत दलालांची संख्या वाढत असून त्यांच्या शिवाय येथे कोणतीही कामे होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी आरटीओ हे नागरिकांना लूट करण्याचे कुरण ठरत आहे. अनिधकृत दलाल बिनदिक्कतपणे परिसरात येऊन नागरिकांची लूट करीत आहेत. दलालांना विशेष लोकप्रतिनिधींचे अभय असल्याचेदेखील बोलले जात आहे. (प्रतिनिधी)

सीमावर्ती नाक्यांसाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा
परिवहन आयुक्त महेश झगडे यांना उच्च न्यायालयाने लगाम लावताच सीमावर्ती नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनचालकांची लूट सुरु झाली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर कोणाचेच अंकुश नसल्याने अधिकारी रात्र, अपरात्री वसुली करीत आहेत. सीमावर्ती नाक्यावर कर्तव्यासाठी वरिष्ठांना मोठी रक्कम देण्याची तयारीसुद्धा अनेक मोटर वाहन निरीक्षकांनी चालविली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी
येथील प्रादेशिक परिवहन विभागात कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी प्रमुख जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने दलालांचा प्रवेश होत असताना ही महत्त्वपूर्ण बाब कॅमेऱ्यात कैद होत नसल्याची माहिती आहे. गर्दीच्या ठिकाणी मुद्दामहून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. सामान्यांची राजरोसपणे आरटीओत लूट होत असताना याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

इमारतीच्या मागील बाजूस होतात व्यवहार
येथील आरटीओत समोरील भागात मोठी वर्दळ राहत असल्याने अधिकारी आणि दलालांचे व्यवहार हे मुख्य इमारतीच्या मागील बाजूस होत असल्याचे दिसून येते. मागील बाजूस दलालांचा वावर असल्याने ठरावीक अधिकाऱ्यांच्या दालनात या दलालांना थेट प्रवेश दिला जातो. कामानिमित्त येणाऱ्यांसोबत आता थेट पैशाचा व्यवहार दलाल खुलेआम करीत असताना आरटीओचे अधिकारी मूग गिळून आहेत.

Web Title: The effect of the Transport Commissioner was overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.