अचलपुरातील ‘गेट’ बंद, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:39+5:302021-05-10T04:12:39+5:30
: पोलिसांचा खडा पहारा फोटो पी ०९ अचलपूर फोल्डर पान ३ चे लिड अचलपूर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ...
: पोलिसांचा खडा पहारा
फोटो पी ०९ अचलपूर फोल्डर
पान ३ चे लिड
अचलपूर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी दुपारी १२ वाजतापासून ते १५ मे रोजीच्या रात्री १२ वाजतापर्यंत लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनची अचलपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशा पध्दतीने पोलिसांनी नाकाबंदी लावली असून शहरातील सर्व गेटवर पोलीस कुमक तैनात करण्यात आली.
लॉकडाऊन व त्याअनुषंगाने काढलेल्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे, तहसीलदार मदन जाधव संदीप कुमार अपार यांनी नागरिकांना केले आहे. रविवारी दुपारी बारा वाजता महसूल, पोलीस, नगर परिषद, आरोग्य विभाग यांनी सामूहिक पेट्रोलिंग करत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहने जप्त करण्यात येईल, अशी ताकीद दिली. अचलपूर पोलिसांनी अचलपुरात विविध ठिकाणी फिक्स पॉईंट लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
खिडकी गेट, दुल्हा गेट, हिरापुरा गेट बंद करण्यात आले असून फक्त वैद्यकीय वाहनांना ये-जा करण्यास सांगण्यात आले आहे. अचलपूर येथील देवडी, चावल मंडी, गांधी पूल, बिलनपुरा या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, सर्व दुकाने बारा वाजता बंद करण्यात आली. रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
सकाळी ११ पर्यंत प्रचंड गर्दी
सकाळी ११ पर्यंत शहरातील प्रत्येक दुकानांवर मोठी गर्दी होती. आठवडाभराचा किराणा, भाजीपाला घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या. यात एटीएमसमोरदेखील मोठी रांग होती. रविवार दुपार १२ नंतर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त पेट्रोल मिळणार नसल्याने हजारो वाहनधारकांनी पेट्रोलपंपांकडे धाव घेतली.