मद्यपीचा इर्विन रुग्णालयातच गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: February 13, 2017 12:04 AM2017-02-13T00:04:10+5:302017-02-13T00:04:10+5:30
मद्यपी रूग्णाने स्वत:चा गळा जिल्हा सामान्य रूग्णालयातच कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
खळबळ : जिल्हा सामान्य रूग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर
अमरावती : मद्यपी रूग्णाने स्वत:चा गळा जिल्हा सामान्य रूग्णालयातच कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजता इर्विनमधील वार्ड क्रमांक ६ मध्ये घडली. भीमराव सोने (४२,रा. चिंचोली गवळी, मोर्शी) असे गंभीर जखमीचे नाव असून त्याला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथिल रूग्णालयात हलविण्यात आले.
भीमराव सोने यांना त्यांच्या पत्नीने मद्यधुंद अवस्थेत ११ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता इर्विनमधील वार्ड क्रमांक ६ मध्ये दाखल केले. अतिमद्यप्राशनामुळे भीमराव सोनेच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. दरम्यान सायंकाळी भीमराव सोने याने स्वत:चा गळा दुपट्ट्याने आवळून आत्महत्येचे प्रयत्न सुरु केले. ही बाब वार्डातील परिचारिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी भीमराव यांना आवरण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, भीमराव काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे परिचारिका वॉर्डबॉय किंवा सुरक्षारक्षकांच्या शोधात वार्डाबाहेर गेली. काही वेळातच वार्डबाय व सुरक्षारक्षकांनी वार्डात पोहोचून स्थिती हाताळली. भीमराव शांत झाल्याचे पाहून सर्वजण कामात मग्न झाले. मात्र, रात्री भीमरावने पुन्हा वार्डातील बाथरुममध्ये जाऊन खिडकीच्या काचा फोडल्या आणि त्या काचा गळ्यावर मारून स्वत:ला गंभीर जखमी केले. काचा फुटल्याचा आवाज होताच वार्डातील परिचारिकांनी तत्काळ बाथरुमकडे धाव घेतली असता भीमराव हा रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिचारिकांनी इर्विन चौकीतील पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी वार्डाकडे धाव घेऊन बाथरुमचे दार उघडले असता भीमराव रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला. पोलिसांनी त्याला तातडीने ओपीडी कक्षात नेले. तेथील डॉक्टरांनी उपचार सुरु केले. भीमरावच्या गळ्यावर खोलवर गंभीर जखमा झाल्याचे आढळताच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि भीमराव शस्त्रक्रिया विभागात नेले. मात्र, त्यानंतरही भीमरावची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कक्षसेवक,
सुरक्षारक्षक बेपत्ता
इर्विन रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. शनिवारी रुग्णाने गळा आवळून व कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वार्डात घडला. मात्र, त्यावेळी परिचारिकांच्या मदतीसाठी एकही कक्षसेवक उपस्थित नव्हता. तसेच परिचारिका मदत मागण्यासाठी धाऊन बाहेर गेली. मात्र, सुरक्षारक्षकांना शोधण्यात बराच वेळ गेला. परिचारिकांना वेळेवर कोणाचीही मदत मिळाली नाही. परिणामी असला प्रकार घडला.