सोयाबीनचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न!

By admin | Published: June 11, 2016 12:14 AM2016-06-11T00:14:40+5:302016-06-11T00:14:40+5:30

तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे.

Efforts to reduce soybean seeds! | सोयाबीनचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न!

सोयाबीनचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न!

Next

तालुका कृषी कार्यालय : कपाशीचा पेरा वाढणार
चांदूरबाजार : तालुक्यातील मागील तीन वर्षांच्या खरीप पिकांचा आढावा घेतला असता उत्पादनाच्या बाबतीत सोयाबीन पिकास सर्वाधिक फटका बसला आहे. निसर्ग, दुष्काळ यासोबत पिकावरील येणाऱ्या किडी व रोग तसेच वर्षानुवर्षे शेतात एकच एक पीक पेरल्या गेल्यामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी आज देशोधडीला लागला असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे.
याचा जाणिवपूर्वक विचार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून खरीप २०१६-१७ या हंगामासाठी सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनांतर्गत स्थानिक कृषी कार्यालयाकडून सोयाबीन पिकाचा पेरा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल कपाशी, तूर, उडीद, मूंग या पिकांकडे अधिक प्रमाणात झुकला असल्याचे दिसून येते. परिणामी याचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा पीक काढणीनंतर शेतकऱ्यांनाच होणार आहे, ही शक्यताही नाकारता येत नाही.
तालुका कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या नियोजनानुसार येत्या खरिपाकरिता पीकनिहाय करण्यात आलेल्या नियोजनात कपाशी २१ हजार हेक्टर, सोयाबीन १८ हजार हेक्टर, तूर १३ हजार हेक्टर, मुंग ३ हजार २०० हेक्टर, खरीप ज्वारी २ हजार हेक्टर, उडीद ४०० हेक्टर याप्रमाणे एकूण ५७ हजार ६०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष पेरणी करताना पावसाच्या आगमनाची वेळ पाहून शेतकऱ्यांकडून पेरणीबदल घडून येण्याची दाट शक्यता असते. हे जरी खरे असले तरी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून तूर पिकाचा पेरा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात तूर पिकाचा पेरा १६ हजार हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तूर पीक हे मुख्य पीक ठेवून या पिकात आंतरपीक म्हणून पहिली पसंती उडीद, दुसरी मूंग व तिसरा क्रमांक सोयाबीन पिकास शेतकऱ्यांकडून मिळत आहे. तसेच सध्या कपाशीला मिळत असलेले बाजारभाव पाहता शेतकऱ्यांचा कल कापूस पिकाकडेही वाढू शकतो.
तालुक्यातील एकूण पेरणी योग्य क्षेत्र ६५ हजार ९२७ हेक्टर असून यातील ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकाखाली पेरणीस वापरण्यात येते. उर्वरित १० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर ५ वर्षांवरील संत्राझाडे असून २ हजार हेक्टर क्षेत्र रबीसाठी राखीव ठेवला जाण्याची शक्यता आहे. तालुक्यात या संपूर्ण क्षेत्रावर १७२ गावे वसली असून यातील ११६ गावे आबाद व ५६ गावे उजाड आहेत. पेरणी खालील क्षेत्राचे वहिवाट करून एकूण ४३ हजार ५८५ शेतकरी करीत असून यात १७ हजार ३८२ अल्पभूधारक, १२ हजार ८०० अत्यल्पभूधारक तर १३ हजार ३९६ मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Efforts to reduce soybean seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.