अपहरण प्रकरणातील आठ आरोपींना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:22+5:302021-03-07T04:13:22+5:30
अमरावती : शारदानगर येथील चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादीसह आठ जणांची ६ मार्चला पोलीस कोठडीची ...
अमरावती : शारदानगर येथील चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दादीसह आठ जणांची ६ मार्चला पोलीस कोठडीची मुदत संपली. आठही आरोपींना शनिवारी न्यायालयीन कोठडीत अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
अहमदनगर व अमरावती येथून चार महिला व चार पुरुष अशा आठ आरोपींना दोन्ही जिल्ह्यांतील पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. अपहरण प्रकरणातील धागेदोरे आरोपींच्या कोठडीदरम्यान पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही दिवसांत याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल होणार आहे. प्रकरणाचा मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जू अजीज (रा. पुणे) हा अद्यापही फरार आहे. त्यांना अटक करण्याचे आवाहन अमरावती व अहमदनगर तपास पथकावर आहेत.
काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी टकलूची पत्नी रुखसार शेख व अहमदनगर येथून एका महिलेला पोलिसांनी अटक केली होती. त्यांनाही न्यायालयासमोर हजर केले असता, ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. पीसीआर संपुष्टात आल्याने त्यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बॉक्स:
- तर समाजात चांगला मेसेज जाईल
अटकेतील आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात ९० दिवसांच्या आत दोषारोपत्र सादर करू. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झाली, तर समाजात चांगला मेसेज जाईल. मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जूला लवकरच गजाआड होतील, असे ‘लोकमत’शी बोलताना पोलीस आयुक्त आरती सिंह म्हणाल्या.