अवैध उत्खननाने आठ एकर शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:50+5:302021-06-22T04:09:50+5:30

धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदाराने खोलाड नदीपात्रासह शेतीचे अधिक उत्खनन केल्याने दोन शेतकऱ्यांच्या जमिनी ...

Eight acres of farmland watered by illegal excavation | अवैध उत्खननाने आठ एकर शेती पाण्यात

अवैध उत्खननाने आठ एकर शेती पाण्यात

Next

धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदाराने खोलाड नदीपात्रासह शेतीचे अधिक उत्खनन केल्याने दोन शेतकऱ्यांच्या जमिनी खचत आहेत. यादरम्यान साडेआठ एकर शेती पाण्याखाली आल्याने सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा येथील प्रताप बाळासाहेब राऊत व अजय राऊत यांचे याच शिवारात शेत आहे. समृद्धी महामार्गावर लागणाऱ्या मुरमाकरिता नजीकचे एक शेत घेऊन उत्खनन केले. विशेष म्हणजे सध्या पावसाने या खड्ड्यात पाणी भरले आहे. त्यामुळे प्रताप राऊत यांच्या साडेआठ एकर शेतीची जमीन पाण्यामुळे खचणे सुरू झाले आहे. दररोज या शेताचा काही भाग ओलाव्यामुळे खचत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

नियम बसविले धाब्यावर

एखाद्या ठिकाणी उत्खननाची खोली ही सहा मीटरपेक्षा अधिक नसावी, अशी अट आहे. परंतु या कंत्राटदाराने तब्बल १२ ते १५ मीटर खोल उत्खनन केले. विशेष म्हणजे, मंजूर क्षेत्राचे सीमांकन करून फलक फलक लावलेला नाही. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक इमारती किंवा मंदिर, नद्या, नाले, जलाशय, दफनभूमी येथून ५० मीटरच्या आत खोदकाम करणार नाही व हानी पोहचणार नाही, असे नियम असताना, खोलाड नदीचे उत्खनन करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह या कंत्राटदाराने बदलविला आहे.

सामूहिक जलसमाधीशिवाय नाही पर्याय

शेतकरी प्रताप राऊत यांनी समृद्धी महामार्ग अंतर्गत रस्ते विकास महामंडळाला अनेक वेळा निवेदन दिले. तालुका प्रशासनापुढे कैफीयत मांडली. मात्र, अद्यापही प्रशासनाचे या गंभीर मागणीकडे दुर्लक्ष आहे. प्रताप राऊत यांची शेती या खड्ड्यालगत असल्याने दररोज ओलाव्यामुळे शेती खचणे सुरू झाले आहे. शेत नापेर ठेवून उपाशी राहण्यापेक्षा संबंधित खड्ड्यात जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे निवेदन या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले आहे.

------

आतापर्यंत प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, साधी शेतीची पाहणी करण्यासाठी कुणीही आले नाही. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराच्या अरेरावीपणामुळे हा प्रकार घडला आहे. त्वरित लक्ष देऊन आर्थिक मदत न मिळाल्यास याच खड्ड्यात जलसमाधी घेणार आहे.

- प्रताप राऊत, आष्टा

Web Title: Eight acres of farmland watered by illegal excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.