आठ मतदारसंघांमध्ये आजपासून धूमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:34+5:30
जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारे शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल व दाखल करता येईल. ४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी त्यादरम्यान तीन दिवस सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज दाखल करण्याला प्रत्यक्षात पाच दिवस मिळणार आहे. शनिवारी पितृपंधरवडा संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या उमेदवारी अर्जाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत. या सहा मतदारसंघांसाठी अनामत रक्कम ही १० हजार रुपये, तर मेळघाट व दर्यापूर या राखीव मतदारसंघांसाठी पाच हजार रुपये आहे. निवडणुकीसाठी एका उमेदवाराला चार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २८ लाखांची खर्चमर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे.
आठही मतदारसंघांत २६०७ मुख्य मतदान केंद्रे व २१ साहाय्यकारी अशी एकूण २६२८ मतदान केंद्रे आहेत. अचलपूर मतदारसंघातील तीन मतदान केंद्रांच्या नावात बदल झाला, तर धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये १०, मेळघाटात ४ व अचलपूर मतदारसंघात २ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल झालेला आहे. या निवडणुकीसाठी आठही मतदारसंघांमध्ये २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदारांचा समावेश आहे.
अमरावती मतदारसंघात एसडीओ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारी अर्जाची प्रक्रिया राहील. बडनेरा मतदारसंघासाठी भातकुली तहसीलदारांच्या कक्षात, धामणगाव मतदारसंघासाठी चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयात, तिवसा मतदारसंघासाठी तिवसा तहसीलदार कार्यालयात, मेळघाट मतदारसंघासाठी धारणी एसडीओ कार्यालयात, दर्यापूर मतदारसंघासाठी दर्यापूर एसडीओ कार्यालयात, अचलपूर मतदारसंघासाठी अचलपूर एसडीओ कार्यालयात व मोर्शी मतदारसंघासाठी मोर्शी एसडीओ तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दररोज ३ वाजेपर्यंत सादर करता येणार आहे.
भारतीय रेव्हेन्यू सेवेतील तीनऑब्झर्व्हर
आठ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी खर्चावर नजर ठेवण्यासाठी तीन ऑब्झर्व्हर राहणार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे, बडनेरा व अमरावती मतदारसंघाकरिता आसाम राज्यातील आयआरएस रामकृष्ण कुंदा, मेळघाट आणि अचलपूर मतदारसंघाकरिता पश्चिम बंगालचे आयआरएस अरूप चॅटर्जी आणि तिवसा, दर्यापूर व मोर्शी मतदारसंघाकरिता केरळ राज्यातील आयआरएस जॉर्ज जोसेफ हे ऑब्झर्व्हर राहणार आहेत.
उमेदवारी अर्जाला मिळणार पाच दिवस
२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाची उचल तसेच सादर करण्याची प्रक्रिया प्रारंभ होणार आहे. मात्र, २८ तारखेला सर्वपित्री अमावस्या व चौथा शनिवार आहे. त्यानंतर २९ ला रविवार आहे तसेच मंगळवारी गांधी जयंती आहे. त्या तीन सुट्या आल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याला फक्त पाच दिवस मिळणार आहे. यामध्येही शनिवारी पितृपंधरवडा संपत असल्याने सोमवारपासून अर्जाची धूम राहणार आहे.
पर्यावरणानुकूल सामग्री वापरण्याचे आवाहन
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये, पोस्टर, बॅनर, कटआऊट, होर्डिंग, कटलरी, पाण्याचे पाऊच किंवा बाटल्या प्लास्टिकच्या असतील, तर त्यामुळे पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.