आठ दिवसांत २४ मध्यम प्रकल्पांत वाढला २२ टक्क्यांनी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:01 PM2019-08-07T19:01:20+5:302019-08-07T19:02:29+5:30
गत आठ ते दहा दिवसांपासून सार्वत्रिक होत असलेल्या पावसामुळे २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा २२ टक्क्यांनी वाढला आहे.
अमरावती - गत आठ ते दहा दिवसांपासून सार्वत्रिक होत असलेल्या पावसामुळे २४ मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा २२ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सदर धरणातून ज्या-ज्या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, तेथील यंदाची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
७ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४३.७५ टक्के पाणीसाठा झाला. २९ आॅगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी २१.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आठवडाभरात २२.१ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली. यंदा नऊ मोठ्या प्रकल्पांत फक्त २४.८८ टक्के पाणीसाठा आहे. मोठे प्रकल्प जरी भरले नसले तरी मध्यम प्रकल्पात यंदा चांगला पाणीसाठा झाला. आणखी दमदार पावसाची शक्यता असल्याने हे प्रकल्प शंभर टक्के भरतील, अशी अपेक्षा आहे.
अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतसुद्धा चांगला पाणीसाठा झाला असून, शहानूर मध्यम प्रकल्पात ६८.६१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ७८.५७ टक्के, पूर्णा ६२.५४ टक्के, सपन सर्वाधिक ८५.२८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पांत ७०.५५ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ३३.०१ टक्के वाघाडी २९.४४ टक्के, बोरगाव ४१.६० टक्के, नवरगाव ८९.०२ टक्के, अडाण ५.८६ टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ३.७८ टक्के, मोर्णा १३.२७ टक्के, वाशीम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पात २७.८२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ५१.५२ टक्के, पलढग १०० टक्के, मस ६०.९० टक्के, मन ३३.८३ टक्के, तोरणा ४२.२१ टक्के, तर उतावळी प्रकल्पात २८.३५ टक्के पाणीसाठा आहे.
चार मध्यम प्रकल्पांना कोरड
चार मध्यम प्रकल्पांची कोरड कायम असून, या प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाने घेतली आहे. सदर प्रकल्पांची घळभरणी यापूर्वीच झाली. मात्र, पाणीसाठा का साचला नाही, यावर जलसंपदा विभाग निरुत्तर राहिले़ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस नसल्याचे कारण समोर केले जात आहे. शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये अकोेला जिल्ह्यातील उमा मध्यम प्रकल्प, घुंगशी बॅरेज, वाशीम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प, तर बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.