नियम पूर्ततेसाठी आठ दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:38 PM2019-07-02T22:38:07+5:302019-07-02T22:38:30+5:30
खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी व फायर आॅडिटच्या मुद्द्यासह सुरक्षिततेच्या मानकांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांद्वारे गठित समितीने शहरातील ११० वर्गांना नोटीस बजावल्या होत्या. आयुक्तांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिली होती. या मुदतीत फक्त ३५ शिकवणी वर्ग संचालकांनी पत्रव्यवहार केला. आता क्लासेसचे वर्गीकरण करून त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर कठोर कारवाई करू, असे आयुक्तांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी कोचिंग क्लासेसची नोंदणी व फायर आॅडिटच्या मुद्द्यासह सुरक्षिततेच्या मानकांचे सर्रास उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांद्वारे गठित समितीने शहरातील ११० वर्गांना नोटीस बजावल्या होत्या. आयुक्तांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी ३० जून ही डेडलाइन दिली होती. या मुदतीत फक्त ३५ शिकवणी वर्ग संचालकांनी पत्रव्यवहार केला. आता क्लासेसचे वर्गीकरण करून त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर कठोर कारवाई करू, असे आयुक्तांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्गांची तपासणी करण्याचे आदेश २६ मे रोजी सबंधितांना दिले होते. या अनुषंगाने सहआयुक्त (मुख्यालय), सहायक आयुक्त (बाजार व परवाना), नगर रचनाकार, शिक्षणाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख, अग्निशमन अधीक्षक या सहा समिती सदस्यांनी महानगरातील पाहणी केली. कुठल्याच नियमाची अंमलबजावणी या ठिकाणी होत नसल्याचे निदर्शनात आल्याने ११० खासगी शिकवणी वर्गांना नोटीस बजावली.
महापालिकेने काही खासगी वर्गांना सील लावल्यानंतर सर्व संचालकांची एकच धावपळ सुरू झाली. महापालिका प्रशासन व संचालक वर्ग यांच्यात झालेल्या दोन बैठकीनंतर ३० जूनच्या आत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करीत असल्याचे मान्य केले व याविषयीचे शपथपत्र मागण्यात आले. मात्र, ३० जूनला फक्त ३५ क्लासेसद्वारे केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. अद्यापही ११० क्लासेसद्वारे महापालिकेच्या तंबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी आयुक्त संजय निपाणे हे बैठकांमध्ये व्यस्त असल्याने मंगळवारी सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांच्या मुदतीनंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शिकवणी वर्गाद्वारे पळवाट
अनेक शिकवणी वर्गांनी फायर आॅडिट केल्याचे नमूद केले, तर काहींनी याविषयीची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेला कळविले. ३० जूनपर्यंत ३५ क्लासेसद्वारे महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, बैठकीत ठरल्याप्रमाणे शपथपत्र काहींनीच दिले आहे. अनेकांनी पळवाटांचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता क्लासेसचे वर्गीकरण करण्यात आल्यानंतर असहकार्य करणाऱ्या क्लासेसवर पुन्हा कारवाई बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त योगेश पिठे यांनी दिली.
खासगी शिकवणी वर्गांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर आठ दिवसांची मुदत दिली जाईल. या अवधीमध्ये नियमांची पूर्तता न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- संजय निपाणे
आयुक्त, महापालिका