अमरावतीत आठ ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:15 PM2018-07-04T22:15:08+5:302018-07-04T22:15:54+5:30
स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.
इलायझा ही तपासणी डेंग्यू आजाराचे निदान करणारी आहे. त्यामुळे हे आठही रुग्ण डेंग्यूबाधित (डेंग्यू संशयित न समजता) म्हणता येतील, असेही आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात डॉ. निचत यांनी म्हटले. तीन रुग्णांचे प्लेटलेट १० हजारांपर्यंत येऊन त्यांना रक्तस्राव झाला होता. इतर रुग्णांचे प्लेटलेटसुद्धा ५० हजारांपेक्षा कमी झाले आहेत. त्यांची इतर लक्षणे डेंग्यू तापाची आहेत. कोणतेही शासकीय वा खासगी डॉक्टर डेंग्यूची लागण झाली नाही, असे नाकारू शकत नाही, असेही उपचारात पुढे आले आहे.
शहरात सात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून, त्यांचे रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरमध्ये तपासण्यासाठी पाठविले आहेत. लवकरच त्याचा अहवालसुद्धा सादर होणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने म्हटले होते. सुदृढ आरोग्यासाठी सतर्क राहण्याचा व डेंग्यूसंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही विभागाने दिला होता.
शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणे
यवतमाळ मेडिकल कॉलेजलासुद्धा डेंग्यू इलायझा हीच तपासणी करण्यात येते. ही तपासणी साधारणपणे सात दिवसांतच पॉझिटिव्ह येते. शासकीय यंत्रणाद्वारा रक्तनमुने उशिरा घेतले जाणे, शीतसाखळी व्यवस्थित ठेवली न जाणे तसेच रक्तनमुने घेतल्यानंतर तपासणीत सात दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणे, किटचा तुटवडा ही शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणे असू शकतात.
डेंग्यूच्या आजाराचा प्रसार हा झपाट्याने होतो व काही रुग्णांना जीवसुद्धा गमवावा लागतो. याशिवाय आजारामुळे खिशावर पडणारा आर्थिक ताण वेगळा. यामुळे या आजाराबद्दलची माहिती प्रशासनाने नागरिकांना देणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी व्यक्त केले आहे.
डेंग्यू, हिवताप हे डासांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे, घरातील पाण्याची टाकी, भांडी आदी आठ दिवसांतून एकदा कोरडे करण्याची गरज आहे. शहरातील स्थिती लक्षात घेता, नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
इतर डॉक्टरांकडे तीन डेंग्यूसदृश रूग्ण
डॉ. निचत यांनी त्यांच्याकडे आठ डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दयासागरमध्ये दाखल दोन व डॉ. अजय डफळे यांच्याकडील एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. म्हणजे, रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.
हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल येईलच; परंतु आरोग्य विभागाने रुग्णांच्या घराजवळील नागरिकांचे रक्तनमुनेसुद्धा घेतले आहेत. सतर्कता बाळगावी; मात्र घाबरण्याचे कारण नाही.
- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिका