साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे आठ धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:12 AM2018-08-31T01:12:12+5:302018-08-31T01:12:33+5:30

मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती ........

Eight earthquake hits Sadhrabadi Wednesday | साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे आठ धक्के

साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे आठ धक्के

Next
ठळक मुद्देसिस्मोग्राफवर २ रिश्टर स्केलपर्यंत नोंद : ‘एनसीएस’ टीम इंचार्जची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/धारणी : मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती या ठिकाणी आठ दिवसांपासून ठाण मांडून असलेले नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) या टीमचे प्रमुख बलबीरसिंग यांनी दिली.
धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा येथे दोन आठवड्यांपासून भूगर्भात हालचाली होत आहेत. मात्र, २१ आॅगस्टला मोठ्या प्रमाणात कंपने, आवाज झाला; अनेक घरांना तडे गेले . यानंतर जिल्हा प्रशासनाने साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी या पथकाला पाचारण केले होते. साद्राबाडी व परिसरात मंगळवारी १.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद गावात बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रावर झाली.
भूकंप म्हणजे काय?
अमरावती : जमिनीत खोलवर जी हालचाल होते व त्यामुळे जी कंपने होतात, त्यालाच आपण भूकंप म्हणतो, अशी साधी व सोपी व्याख्या ‘एनसीएस’चे पथकप्रमुख बलबीरसिंग यांनी सांगितली. साद्राबार्डी परिसरातील भूगर्भातील कंपनांची २.५ ते १.२ रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली. ही भूगर्भातील कंपने आहेत. त्यामुळे या परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच असल्याचे बलविरसिंग यांनी सांगितले. २४ आॅगस्टला दुपारी जीआयएस पथक साद्राबाडी गावात पाहणी करीत असताना २.२१ वाजता पथकातील भूवैज्ञानिकांनी भूंकपाचा धक्का व आवाजाचा थरार अनुभवला. गुरूवारी मध्यरात्री पाच वेळा धक्के जाणवले. या धक्यांची सिस्मोग्राफवर १.५ रिश्टरस्केल अशी नोंद झाली. धक्का जाणवल्यावर विशिष्ट असा वास आला, हा वास कशाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.


गुरुवारी पुन्हा धक्का
साद्राबाडी व झिल्पी गावांमध्ये बुधवारी रात्री १२ नंतर सकाळपर्यंत भूकंपाचे आठ सौम्य धक्के बसल्यानंतर गुरुवारी दुपारी १२.५७ वाजता पुन्हा एक धक्का बसला. ‘एनसीएस’च्या सिस्मोग्राफ यंत्रावर याची तीव्रता २ रिश्टर स्केलपेक्षा कमी नोंदविण्यात आलेली आहे. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क््यांनी आदिवासी बांधवांमध्ये मात्र गोंधळाची स्थिती आहे.

‘जीएसआय’ची टीम पुन्हा डेरेदाखल
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दोन्ही टीमच्या संवादानंतर देणार अहवाल

अमरावती : जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या पथकाने भूगर्भात पाणी झिरपल्याने निर्माण झालेल्या वायूची हालचाल कंपनास कारणीभूत असल्याचे मत नोंदविले. मात्र, भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज हे आता ३५ किमी परिघात पोहोचले आहे व याची श्रुंखला सुरूच असल्याची माहिती प्रशासनाद्वारा देण्यात आल्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञांसह पाच दिवसांतच ही टीम पुन्हा साद्राबाडीत डेरेदाखल झाली. भूवैज्ञानिक मिलिंद धकाते, मुकेश शर्मा, भूपेश उरखडे, प्रसाद, संजय वानखडे आदींनी साद्राबाडी परिसरात घरांना गेलेले तडे, विहिरी, तलाव, आरोग्य केंद्र आदी ठिकाणांची पाहणी केली. टीमद्वारा काही यंत्राच्या सहाय्याने पुन्हा निरीक्षण करण्यात आले. उशिरा रात्री या टीमसोबत एनसीएसच्या पथकातील शास्त्रज्ञांचा संवाद होण्याची शक्यता आहे व त्यानंतर साद्राबाडी येथे नेमके काय, याचा अहवाल मिळून उलगडा होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.

Web Title: Eight earthquake hits Sadhrabadi Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप