करारनाम्याशी आगळीक काम आठ तास, वेतन चार तासांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:22 PM2018-05-04T23:22:27+5:302018-05-04T23:22:27+5:30
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून एका कंत्राटदार संस्थेने संगणक परिचालकांची पिळवणूक चालविली आहे. महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) प्रत्यक्षात आठ तास काम करीत असताना, त्यांना वेतन मात्र चार तासांचे मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून एका कंत्राटदार संस्थेने संगणक परिचालकांची पिळवणूक चालविली आहे. महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) प्रत्यक्षात आठ तास काम करीत असताना, त्यांना वेतन मात्र चार तासांचे मिळत आहे. महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाने या पिळवणुकीबाबत सोईस्कर मौन धारण केल्याने शेकडो संगणक परिचालकांमध्ये प्रशासन आणि कंत्राटदार संस्थेबाबत असंतोष पसरला आहे. काम पूर्णवेळ अन् वेतन अर्धवेळचे का, असा या १०८ संगणक परिचालकांचा प्रश्न आहे. जिल्हास्तरावरील कंत्राटी संगणक परिचालकांच्या संघटनांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा महापालिकेतील शोषित संगणक परिचालकांनी व्यक्त केली आहे.
आस्थापनेवरील अल्प मनुष्यबळ व बहुतांश लिपिकांचे संगणकाविषयी अज्ञानामुळे यंत्रणेने १०८ संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. महापालिकेला अर्धवेळ, अर्धवेतनी डाटा एन्ट्री आॅपरेटर पुरविण्यासाठी या वर्षीच्या सुरुवातीला निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. ९.४५ ते सायंकाळी ५.४५ असा महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचा ‘ड्युटी टाइम’ आहे. त्या कालावधीत अर्धवेळ अर्थात चार तास संगणक चालविण्याकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती फेब्रुवारी २०१८ पासून हे कंत्राट जानकी सुशिक्षित बेरोजगार संस्थेने मिळविले. महापालिकेत आधीच काम करणाºयांसह आणखी काही नवे चेहरे ‘जानकी’ने महापालिकेला आॅपरेटर म्हणून दिले. सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या माहितीनुसार, जानकी संस्थेला महापालिकेकडून प्रति आॅपरेटर नऊ हजार रुपये मासिक मोबदला दिला जातो. त्यातून २५.६१ टक्के रक्कम इपीएफ, तर ६.५० टक्के रक्कम इएसआयसी कपात करण्यात येते. प्रत्यक्षात संगणक परिचालकांना प्रतिमहिना ६,५५५ रुपये दिले जातात. प्रत्यक्षात देण्यात येणारे मानधन व करारनाम्यानुसार अर्धवेळ काम करणे अपेक्षित असताना त्यांचेकडून आठ तास काम करून घेतले जात आहे.
मर्जीतील आॅपरेटरना जादा वेतन ?
१०८ आॅपरेटरपैकी मर्जीतील दोन आॅपरेटरना ६५५५ रुपयांपेक्षा अधिकचे मानधन दिले जात असल्याचा आरोप काही आॅपरेटरनी केला आहे. दादा, भाऊंच्या मर्जीसह काही अधिकाºयांची मर्जी सांभाळणाºयांचा यात समावेश असल्याचे काही आॅपरेटरनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. ज्याला एवढ्या पगारात काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल काम सोडून जावे, असा इशारा काही अधिकारी-कर्मचारी देत असल्याने, अल्पशा पगाराची का होईना, नोकरी टिकून राहावी, या भीतीपोटी कुणी बोलायला तयार नाही. मात्र, त्यांच्यात असंतोष उफाळू लागल्याची चिन्हे आहेत.
संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) अर्धवेळ पुरविण्याबाबत जानकी संस्थेशी करारनामा करण्यात आला आहे.त्या करारनाम्यात ‘अर्धवेळ -अर्धवेतन’चा अंतर्भाव आहे. निविदा प्रक्रियासुद्धा अर्धवेतनावर अर्धवेळ आॅपरेटर पुरविण्यासाठीच करण्यात आली होती.
- दुर्गादास मिसाळ, अधीक्षक सामान्य प्रशासन विभाग
अर्धवेळ अर्धवेतन असा करारनामा असताना संगणक परिचालक पूर्णवेळ काम करीत आहेत. त्यांना तेवढे वेतन द्यावे, यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र देणार आहोत.
- अब्दुल इख्तार
जानकी बहुउद्देशीय संस्था