सुपरमध्ये ‘सुपरमॅन फ्लॅप’द्वारे काढली ब्रेस्ट कॅन्सरची आठ किलोची गाठ
By उज्वल भालेकर | Published: June 30, 2024 08:42 PM2024-06-30T20:42:07+5:302024-06-30T20:42:18+5:30
देशातील तिसरी सर्वांत मोठी शस्त्रक्रिया : वर्षभरात कर्करोगाच्या १९८ शस्त्रक्रिया पूर्ण
अमरावती: विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल) येथे एका महिलेची तब्बल आठ किलो वजनाची ब्रेस्ट कॅन्सरची गाठ काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आले आहे. कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित बागडिया यांनी सुपरमॅन फ्लॅप शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली. गाठीचा व्यास जवळपास ३० ते ४० सेंटिमीटर होता. देशातील ही सर्वांत मोठी तिसरी शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. गेल्या वर्षभरात रुग्णालयात कर्करोगासंबंधी एकूण १९८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे अमरावती विभागातील नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी किडनी प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान बाळांवरील विविध शस्त्रक्रिया, हृदयविकार शस्त्रक्रिया मोफत होत आहेत. जानेवारी २०२३ पासून येथे कर्करोगावरील शस्त्रक्रिया होत आहेत. यामध्ये मुख, मान, ब्रेस्ट, थायरॉइड, ओव्हरी, सर्विक्स, व्हजायनल कॅन्सर तसेच हाडाचे कॅन्सर, फुफ्फुस, प्रेस्टीज कॅन्सर, त्वचा कॅन्सरसंबंधी जटिल शस्त्रक्रिया रुग्णालयात होत आहेत. वर्षभरामध्ये या रुग्णालयात विविध १९८ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पंधरवड्यापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले. महिलेला सुमारे ४० सेंटिमीटर व्यासाची आणि आठ किलो वजनाची गाठ होती. ही गाठ किमोथेरपीने कमी होत नसल्याने अखेर कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अमितकुमार बगडिया यांनी सुपरमॅन फ्लॅप शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकली. सुपरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया होत आहेत. मान व डोक्याच्या कॅन्सर शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ डॉ. रणजित मांडवे, डॉ. भूषण मुंदडा, स्त्रियांशी संबंधित गर्भाशयमुखाच्या कॅन्सरसाठी डॉ. भावना सोनटक्के, आतड्याच्या कॅन्सरसाठी डॉ. रोहित मुंदडा तसेच ब्रेस्ट, थायरॉइड कॅन्सरसाठी डॉ. मनीष तरडेजा व डॉ. अमितकुमार बागडिया हे तज्ज्ञ डॉक्टर शस्त्रक्रिया करतात.
महिलेची ब्रेस्ट कॅन्सरची गाठ मोठी होती. किमोथेरपीमुळेही ती कमी होत नव्हती. त्यामुळे सुपरमॅन फ्लॅप शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ किलोची गाठ काढल्यामुळे त्यांना मानेपासून तर पोटापर्यंत शरीरावर खड्ड्या पडला. पाठीवरील मांस आणि त्वचा याचे त्या जागेवर बगलेतून नेऊन रोपण करण्यात आले आहे.
- डॉ. अमितकुमार बागडिया, कॅन्सरतज्ज्ञ