ब्रिटनहून जिल्ह्यात परतले आठ प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:14+5:302020-12-25T04:12:14+5:30
अमरावती : २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून अमरावती जिल्ह्यात आठ प्रवासी परतले आहेत. यापैकी सात ...
अमरावती : २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून अमरावती जिल्ह्यात आठ प्रवासी परतले आहेत. यापैकी सात महापालिका क्षेत्रात, तर एक दर्यापूर तालुक्यातील आहे. या प्रवाशांसह त्यांच्या सान्निध्यातील अन्य व्यक्तींची आता आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. या कालावधीत इंग्लडहून भारतात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून जिल्हा अथवा महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याविषयीच्या सूचना राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी गुरुवारी दिल्या.
कोरोना विषाणूतील झालेल्या जनुकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इंग्लडमधील काही भागात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला. या विषाणूचा प्रसार किती तरी वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लडहून परतलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कालावधीत परतलेल्या प्रवाशांची यादी जिल्हा व महापालिका प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. या प्रवाशांचा शोध यंत्रणेाद्वारे घेण्यात येऊन ज्या प्रवाशांना भारतात येऊन २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे, त्यांना वगळून इतर प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यात रॅपिड ॲन्टिजेन किंवा अन्य चाचण्या करू नयेत, असे निर्देश आहेत. यात जे प्रवासी निगेटिव्ह आहेत, त्यांचा पुढील २८ दिवस पाठपुरावा करण्यात येणार आहे.या रुग्णांच्या निकट राहणाऱ्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल व या सर्वांची पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात आल्यापासून ५ ते १० व्या दिवसादरम्यान आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
बॉक्स
या रुग्णांची वेगळी व्यवस्था
सर्वेक्षणातील प्रवासी रुग्ण उपचारार्थ दाखल करताना त्यांना इतर कोविड रुग्णांसोबत ठेवू नयेत. त्यांची वेगळी व्यवस्था करण्यात यावी तसेच यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासातील व्यक्ती इतर क्वारंटाईन व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत, अशा रीतीने क्वारंटाईनच्या सूचना राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिल्या आहेत.
बॉक्स
१४ दिवसांनंतर पुन्हा आरटी-पीसीआर
ज्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह असेल, त्यांना नेहमीच्या पद्धतीने उपचार देण्यात यावे. ज्या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये नवीन विषाणूचा प्रकार आढळेल, अशा रुग्णांना डिस्चार्ज देताना १४ व्या दिवशी पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी व ती पॉझिटिव्ह आल्यास, जोपर्यंत २४ तासांच्या अंतराने दोन नमुने निगेटिव्ह येत नाहीत, तोवर डिस्चार्ज देण्यात येऊ नये, अशा सूचना आहेत.