आठ जणांना दृष्टी अन् १२ लोकांना मिळाली किडनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:56 PM2019-03-05T21:56:45+5:302019-03-05T21:57:11+5:30

गत दोन वर्षात जिल्ह्यात ब्रेनडेड घोषित झालेल्या सात जणांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून ३१ रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आणले आहेत. आठ जणांना दृष्टी मिळाली, तर १२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही अशक्यप्राय बाब अवयवदान, नेत्रदान, रक्तदान चळवळीमुळे शक्य झाली, हे विशेष.

Eight people got vision and 12 people Kidney | आठ जणांना दृष्टी अन् १२ लोकांना मिळाली किडनी

आठ जणांना दृष्टी अन् १२ लोकांना मिळाली किडनी

Next
ठळक मुद्दे३१ रुग्णांच्या जीवनात बहरला आनंद : नेत्रदान, अवयवदान, रक्तदान चळवळ ठरली लाभदायक

सुनील चौरसिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत दोन वर्षात जिल्ह्यात ब्रेनडेड घोषित झालेल्या सात जणांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून ३१ रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आणले आहेत. आठ जणांना दृष्टी मिळाली, तर १२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही अशक्यप्राय बाब अवयवदान, नेत्रदान, रक्तदान चळवळीमुळे शक्य झाली, हे विशेष.
गत वर्षभरात जिल्ह्यात ८० जणांनी अवयवदान केले. १२१३ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला आहे. सामाजिक जाणिवेतून नेत्रदान, अवयवदान, रक्तदान चळवळीत हिरीरीने सहभागी होण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्यात मार्च २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ब्रेनडेड झालेल्या सात जणांचे अवयवदान करण्यात आले आहे. त्यांच्या अवयवांच्या बळावर विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या ठिकाणी ३१ रुग्णांना जीवनदान देण्याची किमया साधली गेली आहे. यात डॉक्टरांची भूमिका मोलाची ठरली.
ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीच्या शोकमग्न स्थितीत त्यांना सावरून घेऊन मृताच्या अवयवाचे दान डॉक्टरांनी मागितले. त्यांच्या समुपदेशनाचा योग्य परिणाम होऊन अशी परवानगी त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली. ही सामाजिक चळवळ वेगाने पुढे जात असल्याचे वास्तव आहे.
ब्रेनडेड झालेल्या अशा व्यक्तींचे वैद्यकीय तपासणीअंती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन हृदय, सात यकृत, १२ किडनी, फुफ्फुस, आठ नेत्र अशी अवयवदानाची यादी आहे. एवढेच नव्हे तर एका रुग्णाची त्वचादेखील दान करण्यात आली. अशाप्रकारे त्वचा प्रत्यारोपणाच्या अनोख्या विक्रमाची नोंद अमरावतीकरांच्या भरीव योगदानातून नोंदविली गेली. हे अवयव नागपूर, अहमदाबाद यासह अन्य जिल्ह्यात प्रत्यारोपित करण्यात आले.
८० जणांनी केला अवयवदानाचा संकल्प
स्थानिक विदर्भ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ८० जणांनी अवयवदानाचा संकल्प घेतला. त्यांना डोनेट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून अवयवदान करण्याचे आवाहन सीएस श्यामसुंदर निकम, सतीश वडनेरकर, वननाथ सरोदे यांनी केले आहे.
हे अवयव करता येतील दान
ब्रेनडेड झालेल्या अथवा मृत पावलेल्या व्यक्तीचे किडनी, फुफ्फुस, यकृत, हृदय, डोळे, त्वचा अवदान देता येऊ शकतात. तथापि, मृत्यूपश्चात चार तासांच्या आत अवयवदानाची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे, अन्यथा ते अवयव कामी येणार नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Eight people got vision and 12 people Kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.