पेयजलाचे आठ नमुने दूषित
By admin | Published: April 24, 2017 12:40 AM2017-04-24T00:40:57+5:302017-04-24T00:40:57+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व भागातील पेयजलांची तपासणी करण्यात येत आहे.
महापालिकेची मोहीम : स्वाईन फ्लूची उपाययोजना
अमरावती : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व भागातील पेयजलांची तपासणी करण्यात येत आहे. १७ एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या तपासणीत ७० पैकी आठ पाणी नमुने दूषित आढळलेत. त्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ५ मे पर्यंत ही मोहीम राबविली जाईल.
शहरात एकीकडे स्वाईन फ्लूने चार बळी घेतले असताना तापाच्या रुग्णातही मोठी वाढ झाली आहे. यातच दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. गृहभेटीदरम्यान झालेल्या सर्वेक्षणात ताप आणि अन्य तापसदृश्य रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील शाळा, हॉटेल, मंगल कार्यालय, पाण्याच्या कॅन्स, लस्सी सेंटर, सार्वजनिक नळ, सार्वजनिक महत्त्वाच्या विहिरींची तपासणी कार्य सुरू करण्यात आले आहे. शुक्रवार २१ एप्रिलपर्यंत सुमारे ७० पाणी नमुने घेण्यात आले. त्यातील काही कार्यालये आणि कॅनच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे पाणी दूषित आढळून आले आहे. ज्या आठ ठिकाणची पाणी नमुने दूषित आढळलेत. त्या आस्थापनाप्रमुखांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. १७ एप्रिलपासून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली.
महापालिकेत आज बैठक
अमरावती : राजकमल ते बडनेरा रोड, १८ एप्रिल गांधी चौक ते साईनगर, १९ एप्रिल रोजी राजकमल ते रुख्मिणीनगर व बसस्थानक, २० एप्रिलला राजकमल, राजापेठ व कंवरनगर, २१ एप्रिलला कोर्ट रोड ते दस्तुर नगर चौक, या भागातील पाणी नमुने घेण्यात आले. ते तपासणीसाठी पाठविले आहे. २४ एप्रिलला राजकमल ते पंचवटी, २५ एप्रिलला पंचवटी ते रहाटगाव, २६ एप्रिलला विलासनगर ते रतनगंज, २७ एप्रिलला नागपुरी गेट ते पठाण चौक, लालखडी, २८ एप्रिलला भाजीबाजार ते हनुमान नगर, २९ एप्रिलला पंचवटी ते व्हिएमव्ही, कठोरा नाका, २ मे रोजी राजापेठ ते शेगाव नाका, ३ मे रोजी चौधरी चौक ते शेगाव नाका, ४ मे रोजी गांधी चौक ते माताखिडकी, महाजनपुरा, कुंभारवाडा व ५ मे रोजी अंबागेट, सराफा व साबनपुरा भागात पाणी तपासणी होणार आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर उपाययोजनावर शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका सभागृहात स्वाईन फ्लू प्रतिबंधासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची तपासणी अभियान राबविण्यात येत आहे.
- सीमा नैताम,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका