अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाके थांबली; ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला विराेध

By गणेश वासनिक | Published: January 1, 2024 07:19 PM2024-01-01T19:19:30+5:302024-01-01T19:19:38+5:30

देशव्यापी संपात सहभागी, नागपुरी गेट ते जिल्हा कचेरीपर्यंत दुचाकी रॅली, केंद्र सरकारला शिष्टमंडळाने पाठविले निवेदन

Eight thousand trucks, tanker stopped at Amravati; Opposition to the 'hit and run' law | अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाके थांबली; ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला विराेध

अमरावती येथे आठ हजार ट्रक, टँकरची चाके थांबली; ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याला विराेध

अमरावती: केंद्र सरकारकडून वाहन चालक-मालकांसाठी प्रस्तावित असलेल्या ‘हिट ॲन्ड रन’ या कायद्याला रोड ट्रान्सपोर्ट फ्रेटरनिटीने तीव्र विरोध केला आहे. त्याअनुषंगाने सोमवारपासून संप पुकारण्यात आला असून, अमरावती जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ट्रक- टँकरची चाके थांबली आहेत. हा अन्यायकारक कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी नागपुरी गेट ते जिल्हा कचेरीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फंत केंद्र सरकारकडे निवेदन पाठविण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनातून केंद्र सरकारने २८ जानेवारी २०२३ रोजी लोकसभा अधिवेशनात वाहन चालक-मालकांसाठी एक अध्यादेश पारित केला आहे. यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ‘हिट ॲन्ड रन’ अन्वये वाहनाच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वाहन चालकाला सात लाखांचा भुर्दंड द्यावा लागेल अथवा दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

वाहन चालकांसाठी हा नवा कायदा अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि युनायटेड फ्रंड राष्ट्रीय मोर्चा या देशातील दोन मोठ्या ट्रान्सपोर्ट संघटनाच्या बॅनरखाली ट्रान्सपोर्टर, ट्रक चालक-मालकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यात जिल्ह्यातील सात हजार ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, पाचशे पेट्रोल-डिझेल टँकर चालक-मालक यासह १६० मालधक्का ट्रक चालक-मालकांचा समावेश आहे. तसेच या संपात प्रमुख सात वाहन चालक-मालक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जागोजागी ट्रक, टँकर व अन्य वाहनांची चाके थांबलेली आहेत.

Web Title: Eight thousand trucks, tanker stopped at Amravati; Opposition to the 'hit and run' law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.