आठ वर्षांनंतर सुटणार 'प्रभारी'चे ग्रहण !
By admin | Published: June 6, 2016 12:16 AM2016-06-06T00:16:28+5:302016-06-06T00:16:28+5:30
अमरावती महापालिकेच्या आरोग्य विभागाला लवकरच नियमित स्वरुपात 'मुखिया' मिळणार आहे.
संकेत : महापालिकेत नवे वैद्यकीय आरोग्य अधिकारी लवकरच
प्रदीप भाकरे अमरावती
अमरावती महापालिकेच्या आरोग्य विभागाला लवकरच नियमित स्वरुपात 'मुखिया' मिळणार आहे. तब्बल साडेसहा लाख लोकसंख्येचे आरोग्य आणि नागरी स्वच्छतेचा अधिभार उचलणाऱ्या आरोग्य विभागाचा डोलारा आठ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांचा खांद्यावर आहे. प्रभारीची या जबाबदारीतून लवकरच मुक्तता होण्याचे संकेत आहेत.
श्यामसुंदर सोनी यांची नियत वयोमानाने सेवानिवृत्ती झाल्यानंतर या पदाचा तात्पुरता पदभार सीमा नेताम यांच्याकडे आहे. महापालिकेला नियमित वैद्यकीय आरोग्य अधिकारी असावा, या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी जाहिरात काढून पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागितले. महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदासाठी एमबीबीएस आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ हा डिप्लोमा अशी प्राथमिक पात्रता धारक करणाऱ्याकडून ३१ मे पर्यंत आवडीने स्वीकारण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाकडे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करावयाचे होते.
३१ मे पर्यंत वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर कायमस्वरुपी नियुक्तीसंदर्भात १८ डॉक्टरांकडून अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी छाननीअंती ५ अर्ज पात्र ठरल्याचे सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या पाचपैकी एका पात्रताधारक उमेदवारांची वैद्यकीय अधिकारीपदी कायमस्वरुपी नियुक्ती होणार आहे. (प्रतिनिधी)
आठ वर्षांपासून प्रभारीवर 'भार'
एम.आर. गट्टाणी आणि आर.एम. डेहणकर या दोन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा १५ आॅगस्ट ८३ ते १५ आॅगस्ट २००८ हा प्रदीर्घ कार्यकाळ वगळला तर अन्य सर्व डॉक्टरांवर आलटून-पालटून वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा 'प्रभारी' अशीच जबाबदारी होती. तूर्तास १ फेब्रुवारी २०१६ पासून सीमा नेताम यांच्याकडे या महत्त्वपूर्ण पदाचा प्रभार आहे. सीमा नेताम यांच्यासह श्यामसुंदर सोनी, ए.एच. राठी यांनी हा प्रभार पाहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी १८ डिसेंबर २००८ ते २५ मार्च २०१० या कालवधीत सीमा नेताम यांच्याकडे प्रभार होता. नव्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने या पदाला लागलेले 'प्रभारी' चे ग्रहण सुटणार आहे.
हे आहेत इच्छुक डॉक्टर
प्रवीण घोंगटे (शेगाव), विदिशा गवई (शामनगर अमरावती), हॅरी सुभाष पवार (उस्मानाबाद), दीप्ती डाडे (अमरावती), पूनम गोसावी (नंदुरबार), विशाल उबाळे (लातूर), अतूल जगताप (लातूर), प्रवीण पारिसे (शिरजगाव कसबा), विशाल काळे (वर्धा), हर्षवर्धन डेरे (अमरावती), सुषमा देशमुख (अमरावती), पूनम बनकर (नागपूर), सविता मेश्राम (नागपूर), वीरेंद्र जाधव (अकोला), मिलिंद खडसे (चांदूर बाजार), प्रफुल्ल गुजर (अमरावती), राहुल चोपडे (बुलढाणा), बोडखे (अमरावती) या डॉक्टर उमेदवारांनी महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी एकाची कायमस्वरुपी नियुक्ती होणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले
लेखी परीक्षेची तारीख पुढे ढकलली
३१ मे पर्यंत आवेदन पत्र स्वीकारल्यानंतर ५ जूनला संबंधित उमेदवारांची लेखी परीक्षा होणार होती. मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे उपायुक्त (प्रशासन) यांनी सांगितले आहे. नियमित आयुक्त रजेवर असल्याने लेखी परीक्षा पुढे ढकलल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे ५ जूनलाच पात्र उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या.