‘एक पेड मेेरे माॅं के नाम’, देशात १४० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प
By गणेश वासनिक | Published: June 23, 2024 03:12 PM2024-06-23T15:12:45+5:302024-06-23T15:13:00+5:30
केंद्र शासनाची भारतीयांना साद, सुखाची सावली अन् आईचं झाड
अमरावती : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही.
पावसाळा आला की, शासनाला वृक्ष लागवडीची आठवण येते. कारण राज्यात दरवर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचा ध्यास असला, तरी यंदा महाराष्ट्र वृक्ष लागवडीमध्ये कमालीचा माघारलेला आहे. दर्जेदार रोपे तयार करण्यासाठी वन विभाग अथवा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेला आवश्यक तेवढा निधी महसूल विभाग देत नसल्याची ओरड आहे. गेल्या ३ वर्षांपासून मग्रारोहयो कामाचा जवळपास ५ कोटींचा निधी अद्यापही मिळालेला नाही. असे असताना महसूल विभाग रोपे तयार करण्याची सक्ती वन विभागावर करताना दिसून येतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती दरवर्षी वृक्ष लागवड करतात. मात्र त्यातील किती वृक्ष जिवंत राहतात, याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.
एक पेड मेरे माॅं के नाम
केंद्र शासनाच्या पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाचे सचिव लीला नंदन यांनी देशात नवीन योजना सुरू केली आहे. भारताची लोकसंख्या १४० कोटी असताना तेवढीच झाडे लागावी, याकरिता ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ याला वृक्ष रोपवनाशी जोडलेले आहे. देशातील सर्व विभाग, स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी केले जाईल. यंदा १४० कोटी वृक्ष या माध्यमातून देशात लावले जाणार आहेत.
संरक्षण दलाला देणार मोफत वृक्ष
पोलिस, संरक्षण दल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जमीन आहे. मात्र आर्थिक तरतूद नसल्याने पोलिस व संरक्षण दलाला किमान ५ हजार रोपे मोफत देण्याचा मानस वन विभागाचा आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याकरिता अशा विभागांच्या पडिक जमिनीत वृक्ष लागवड झाल्यास रोपवनांचे टार्गेट पूर्ण होणार असल्याबाबतची शक्कल लढवली जात आहे.