शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:17 PM2024-10-01T15:17:50+5:302024-10-01T15:20:27+5:30

अमरावती गोळीबार : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेळीच पोलीस आल्याने ते वाचले.

Eknath Shinde's Shiv Sena Amravati District Chief Gopal Arbat was shot at | शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?

शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?

Amravati News Marathi : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमरावतीचे जिल्हाप्रमुख गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात वाचले. जिल्हाप्रमुख गोपाल अरबट हे कारमधून जात असताना गोळीबार करण्यात आला, गोळी काचेवर जाऊन लागली. त्यानंतर गोपाल अरबट वेगाने तिथून निघाले. काही जण त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आल्यामुळे ते थोडक्यात वाचले. शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलहातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुखावर गोळीबार, काय घडले?

गोपाल अरबट यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमरावतीतील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद असून, त्यातून अरबट यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा होत आहे. 

अमरावती-दर्यापूर मार्गावरील पाटील ढाब्यासमोर सोमवारी मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. 

तक्रारीतील माहितीनुसार, गोपाल अरबट हे अमरावतीमधील कामं आटोपून इनोव्हा कारने दर्यापूरला जात होते. चांगापूर फाट्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ गाडी आली. त्या गाडीतून उतरलेल्या तीन-चार जणांनी अरबट यांची गाडी थांबवली आणि शिवीगाळ केली. 

त्यानंतर गोपाल अरबट पुढे निघून गेले. ते पाटील ढाब्यापर्यंत आले. तिथे त्यांना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसली. ते तीन-चार जण गाडी थांबवण्याचा इशारा करत होते. पण, अरबट यांना एका व्यक्तीच्या हातात पिस्तूल दिसले.

कारच्या काचेवर लागली गोळी

अरबट बघत असतानाच एकाने गोळी झाडली. ती त्यांच्या गाडीच्या काचेवर जाऊन लागली. अरबट घाबरले. त्यांनी वेगाने गाडी दर्यापूरच्या दिशेने पळवली. गाडी चालवत असतानाच त्यांनी पोलिसांना फोन केला. त्यावेळी दोन गाड्या त्यांचा पाठलाग करत होत्या. मग त्यांनी आसेगाव टी पॉईंटवरून गाडी खल्लार शिंगणापूर मार्गावर आणली. त्यावेळी समोरून पोलीस येत होते. त्यामुळे अरबट हे थोडक्यात हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले.

Web Title: Eknath Shinde's Shiv Sena Amravati District Chief Gopal Arbat was shot at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.