वयस्क महिलेची १.५३ कोटी रुपयांनी फसवणूक; तब्बल २३० खात्यांत ट्रान्स्फर करून विड्रॉलही !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 01:39 PM2024-07-05T13:39:04+5:302024-07-05T13:39:35+5:30

Amravati : शेअर मार्केट, क्रिप्टोकरंसी फ्रॉडचे कनेक्शन थेट फिलिपिन्सशी

Elderly woman cheated of Rs 1.53 crore; Transfer to as many as 230 accounts and withdraw! | वयस्क महिलेची १.५३ कोटी रुपयांनी फसवणूक; तब्बल २३० खात्यांत ट्रान्स्फर करून विड्रॉलही !

Elderly woman cheated of Rs 1.53 crore; Transfer to as many as 230 accounts and withdraw!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
येथील एका सिनिअर सिटिझन महिलेची शेअर व क्रिप्टोकरंसीमध्ये तब्बल १.५३ कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. त्या टोळीचा म्होरक्या मोहित भोपाळ (४०) हा मूळ दिल्लीचा असून तो फिलिपिन्स देशात बसून, तेथील नागरिकत्व घेऊन ते नेटवर्क हाताळत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर सायबर पोलिसांनी अमरावती येथील एका तरुणीसह अकोल्याच्या चौघांना अटक केली आहे. ती रक्कम देशभरातील तब्बल २३० खात्यात ट्रान्सफर करून ती विड्रॉल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरुवारी दिली.


याप्रकरणी दक्षता (२४, रा. अमरावती), शुभम गुलाये (२३, म्हाडा कॉलनी, अकोला), गौरव अग्रवाल (२३, रा. यशोदानगर, कौलखेड, अकोला), नमन डहाके (२३, रा. रिंग रोड, कौलखेड अकोला) व रवी मौर्या (३३, रा. जाजूनगर, अकोला) यांना अकोला व नागपूर येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून विविध बँकेचे चेकबुक, पास बुक, २० एटीएम कार्ड, १७ सीमकार्ड, एसडी कार्ड, रबर स्टॅम्प व सहा मोबाइल जप्त करण्यात आले. त्यांना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


सायबरच्या ठाणेदार कल्याणी हुमने व सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. यातील ७.४५ लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. पत्रपरिषदेला डीसीपीत्रयी कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील यांच्यासह क्राइम एसीपी शिवाजीराव बचाटे उपस्थित होते.


अशी होती तक्रार
■ येथील एका महिलेने २७ जून रोजी त्याबाबत शहर सायबर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. आरोपींनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मॅसेज करून शेअर मार्केट तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा देण्याचे आमिष दिले. वियाका एक्स्चेंज नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी गुंतवणूक केली.


टीडीएस भरण्यासाठी ७५ लाख रुपये कर्ज
६६ लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर चार कोटी रुपये नफा झाल्याचे महिलेला सांगण्यात आले. मात्र, नफ्याची रक्कम विड्रॉल करायची असेल तर टीडीएस भरावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यामुळे महिलेने एफडी मोडून व सुमारे ७५ लाख रुपये कर्ज घेऊन ती रक्कम आरोपींकडे ट्रान्सफर केली. मात्र, त्यानंतरही आरोपींनी टाळाटाळ चालविली.

४२ लाख ८२ हजार ८२४ रुपये हे येथील स्थानिक शाखांसह कोटक महिंद्रा बँक, गुजरात, बंधन बैंक, हैदराबाद, फेडरल बँकेसह गुजरात, पंजाब, कर्नाटक, तेलगंणा येथील १४ बँक अकाऊंटमध्ये तर उर्वरित रक्कम ही २१६ बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली. ती अवघ्या दोन दिवसांत विड्रॉलदेखील केली.


ती रक्कम लोकल खात्यात, रवीने बनविली टोळी
फिर्यादी महिलेचे ४२.८२ लाख रुपये एसबीआयच्या येथील बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. ते खाते येथीलच एका मॉलमध्ये काम करणाऱ्या दक्षता नामक २४ वर्षीय तरुणीचे असल्याचे तपासात उघड होताच तिला अटक करण्यात आली. स्वतःचे बँक अकाऊंट मुख्य आरोपींना देऊन त्या अकाऊंटचे डिटेल्स, चेक बुक व एटीएम तिने मुख्य आरोपी मोहितला दिल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी तिला रक्कमदेखील देण्यात आली. स्थानिक स्तरावर रवी मौर्या हा मुख्य आरोपी आहे. त्यानेच येथे टोळी बनविली.
 

Web Title: Elderly woman cheated of Rs 1.53 crore; Transfer to as many as 230 accounts and withdraw!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.